पुणे : जोहर बाहरू- मलेशिया येथे झालेल्या आशियाई पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी स्ट्रॉंग वुमन ऑफ एशिया किताब पटकावला. १३४ किलोच्या आशियाई स्कॉट रेकॉर्ड सह ३५६.५ किलो एकूण वजन उचलत शर्वरी इनामदार यांनी भारतासाठी विजयश्री खेचून आणली.
कझाकिस्तान, जपान, चायना, कुवेत, मंगोलिया, पाकिस्तान, कतार, फिलिपिन्स, इंडोनेशिया, हॉंगकॉंग, सिंगापूर, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, थायलंड इत्यादी २६ देशांचे सुमारे ४५० स्पर्धक सहभागी झाले होते.
बेस्ट लिफ्टर होण्यासाठी त्यांना ऑस्ट्रेलियाची फाम थाओ आणि हॉंगकॉंगची जेनिफर मेकॉंमबी यांच्याशी कडवी झुंज द्यावी लागली. महिलांच्या ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदकासह त्यांनी मानाचा “स्ट्रॉंग वुमन एशिया” हा किताबही पटकावला. २०२३ मधील क्लासिक व इक्विप्ड या दोन्ही वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकल्यानंतर लगेचच झालेल्या या आशियाई स्पर्धेत त्यांनी आपले निर्विवाद वर्चस्व टिकवून ठेवले. आशियाई रेकॉर्ड, टोटलचे गोल्ड मेडल, स्कॉट गोल्ड मेडल, डेडलिफ्ट सिल्व्हर मेडल, बेंचप्रेस सिल्व्हर मेडल, “स्ट्रॉंग वुमन ऑफ एशिया” टायटल असे चौफेर यश मिळवत त्यांनी स्पर्धा गाजवली. “आहार “आयुर्वेद क्लिनिक व “कोड ब्रेकर” जिम च्या संचालिका डॉ. शर्वरी यांचे या अतुलनीय कामगिरीसाठी सर्वत्र कौतुक होत आहे. आपले कुटुंबीय, आप्तेष्ट व देशासाठी खेळण्याची जिद्द यामुळे सतत न थकता प्रयत्न करण्याची ऊर्जा मिळते असे त्यांनी सांगितले.

