पुणे-पुण्यातील एका सराफाला खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गाजलेले पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, हनुमंत संभाजी खेमधारे, सतीश जाधव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या 85 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) टाच आणली आहे.पीएमएलए कायद्यानुसार या सर्वांच्या पुणे, सोलापूर आणि अहिल्यानगर येथील स्थावर मालमत्तांवर ईडीने टाच आणली आहे. बांदल यांच्या पुण्यातील महंमदवाडी, शिक्रापूर आणि बुरुंजवाडी (ता.शिरूर) येथील निवासस्थानांवर ईडीच्या पथकाने ऑगस्ट महिन्यात छापे टाकले होते. मंगलदास बांदल यांच्याकडे 5 आलिशान गाड्या आणि 1 कोटी किमतीची चार मनगटी घड्याळेही आढळून आली होती. शिवाजीराव भोसले सहकारी बँक फसवणूक प्रकरणी हि कारवाई केल्याचे सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्याच्या राजकारणात बांदल यांच्या नावाच्या वारंवार चर्चा केल्या जातात. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील बांदल पैलवान म्हणूनही त्यांची ओळख आहे. मंगलदास बांदल हे पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम विभागाचे माजी सभापती आहेत, वारंवार पक्षबदलाचे आरोप त्यांच्यावर होत असतो.मंगलदास बांदल हे कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. पुण्यातील एका सराफाला खंडणी मागितल्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. याशिवाय मंगलदास बांदल यांनी 2009 ला भाजपकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. अपक्ष उमेदवार म्हणून ते जिल्हा परिषदेवरही निवडून गेले होते. तर 2019 मध्येही त्यांनी दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
बँक फसवणुकीचे नेमके काय होते प्रकरण?
शिरूर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे माजी सभापती मंगलदास बांदल यांनी बनावट खरेदी खताच्या आधारे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेकडून सव्वा कोटींचे कर्ज घेतले आणि त्याची परतफेड न करत एका नागरिकाची फसवणूक केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी 26 मे 2021 रोजी अटक केली होती. दत्तात्रय मांढरे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर बांदल यांच्यावर कारवाई झाली होती. मंगलदास बांदल यांनी फिर्यादी मांढरे यांच्याशी सुरुवातीला मैत्रीचे संबंध निर्माण केले. मांढरे यांच्या नावावर खोटे खरेदी खत करून बांदल यांनी त्या आधारे शिवाजीराव भोसले बँकेतून आठ लाख रुपये कर्ज घेऊन ते स्वतः वापरले. त्यानंतर पुन्हा सदर मिळकतीवर कर्जाकरिता मांढरे यांचे कुलमुकात्यारपत्र व बोगस पुरवणी दस्त करून शिवाजीराव भोसले बँकेतून सव्वा कोटी रुपये कर्ज घेत तेही स्वतः साठी वापरले. त्याचे कर्ज हप्ते अडीच कोटी रुपयापर्यंत गेले आहे. या प्रकरणी फसवणूक झाली म्हणून मांढरे यांनी फिर्याद दिली होती.

