जालना-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे. या प्रकरणी त्यांनी फडणवीसांवर मराठा समाजाच्या तरुणांचे आयुष्य बेचिराख करण्याचा आरोप केला आहे.
मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाचे आयुष्य बेचिराख केले आहे. मराठा समाजाने या लोकांना सत्तेत बसवले. पण त्यांनीच मराठा समाजाच्या मुलांचे आयुष्य उद्धवस्त करण्याचे काम केले. त्यामुळे समाजाने या निवडणुकीत 100 टक्के मतदान करून या सरकारला त्याची जागा दाखवली पाहिजे. आपल्या समाजाची प्रतिष्ठा जपावी. या सरकारला त्याची जागा दाखवून द्यावी.
फडणवीस यांनी मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता अक्षरशः भिकारी ठेवण्याचे काम केले.
मनोज जरांगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला बेदखल करण्याचे काम केले. कष्टकरी, कामगार, शेतकरी यांची आशा आकांक्षा संपवली. त्यांनी मराठा समाजा तरुणांचे आयुष्य बेचिराख करण्याचे काम केले. त्यांनी सत्तेचा वापर मराठ्यांविरोधात केला. त्यांनी सुरुवातीपासूनच मराठा समाजाला आरक्षण न देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या या खेळीमुळे मराठा समाजाची मुले आरक्षण, शिक्षण व नोकरीपासून वंचित राहिले. सामाजिक चळवळीत वैचारिक मतभेद असू शकतात, पण फडणवीस यांनी मराठा समाजाच्या पोरांना आरक्षण न देता अक्षरशः भिकारी ठेवण्याचे काम केले. ते आमच्यासोबत द्वेषाने वागले. त्यांनी मराठ्यांच्या शेपटीवर पाय ठेवण्याचे काम केले.
अशी लाट पुन्हा येणार नाही. हा समाजाच्या प्रतिष्ठेचा विषय आहे. आज समाजावर सर्वात मोठे संकट आले आहे. हे संकट परतावून लावण्याची हीच योग्य वेळ आहे. यावेळी तुम्ही मतदानरुपी ताकद दाखवली नाही, तर तुमच्या लेकरांना या जगात कुणीही वाली असणार नाही. या महासंकटातून तुमची जात व तुमचे लेकरं बाहेर काढायचे असतील, तर तुम्हाला तुमचे मनात व मतात दोन्हीत परिवर्तन करावे लागेल.
या निवडणुकीत तुम्ही परिवर्तन केले नाही, तुम्ही वेळ विसरली, योग्यवेळी मुलांच्या व जातीच्या बाजूने उभे न राहता आपल्या पक्षाच्या व नेत्याच्या बाजूने राहिलात तर रडण्यासाठीही माणूस शिल्लक राहणार नाही, असा इशाराही मनोज जरांगे यांनी यावेळी दिला.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, आज मराठा समाजाची मुले-मुली नरकयातना भोगत आहे. सत्ताधारी मराठा समाजाला बाजूला ठेवून सत्तेत येण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्यांच्या 17 पिढ्या आल्या तरी त्यांना महाराष्ट्रात मराठा समाजाला बाजूला ठेवून सत्तेत येता येणार नाही. कारण, इथे प्रश्न केवळ मराठ्यांचा नाही. इथे गोरगरीब दलित, मुस्लिम व शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. मराठ्यांनी आपल्या समाजाला बळ व शक्ती देण्याचे काम करा. तुम्ही आतापर्यंत एकजूट दाखवली. ही एकजूट निवडणुकीतही दाखवा. 100 टक्के मतदान करा.
या निवडणुकीत मराठा समाजाच्या माय-माऊल्यांसह विद्यार्थी, विद्यार्थिनी, वयोवृद्ध मतदार कुणीही घरात राहता कामा नये. सर्वांनी झाडून मतदान केले पाहिजे. एकही मतदान यावेळी वाया जावू देऊ नका. ही आपल्या समाजासह आपल्या मुलांच्या अस्तित्वाची लढाई आहे. हा समाज कधीच हरू देऊ नका. आता धुरा तुमच्या खांद्यावर आहे. आतापर्यंत सरकाच्या खांद्यावर धुरा होती. पण त्यांनी जातीवाद व भेदाभेद करून आपली जबाबदारी टाकून दिली. पण आता ही धुरा आपल्या खांद्यावर आहेत. कारण, मतदान आपल्याकडे आहे, त्यांच्याकडे नाही. या मतांचा योग्य तो वापर करा.
सत्ताधाऱ्यांनी मराठा समाजाची लेकरे भिकारी करण्याचा डाव रचला आहे. त्यामुळे आपणही त्यांची जिरवायचा निश्चय करायचा आहे. लोकसभा निवडणुकीत जशी सर्वांनी आपली ताकद दाखवली, तशीच ताकद आता पुन्हा आपल्याला विधानसभा निवडणुकीत दाखवायची आहे. हा आपल्या समाजाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे. त्यांना कोणत्याही स्थितीत आपल्याला संपवायचे आहे. त्यामुळे त्यांना त्यांची जागा दाखवणे आपले काम आहे, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.

