मुंबई-धारावी विकास प्रकल्पात देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा सुरू आहे. त्यामुळे धारावी वाचली तरच मुंबई वाचेल. धारावी हा पहिला घास असून, त्यानंतर संपूर्ण मुंबई गिळण्याचे गुजराती लॉबीचे मोठे कारस्थान आहे, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
शिवसेनेचा ठाकरे गट आज धारावी विकास प्रकल्पाचे कंत्राट मिळालेल्या अदानी उद्योग समूहाविरोधात मोर्चा काढणार आहे. या निमित्ताने संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात त्यांनी धारावीत देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा सुरू असल्याचा दावा केला. ते म्हणाले की, धारावी प्रकल्पात देशातील सर्वात मोठा घोटाळा सुरू आहे. धारावी वाचवा म्हणजे मुंबई वाचवा. धारावी हा पहिला घास असून, त्यानंतर संपूर्ण मुंबई गिळण्याचे कारस्थान गुजराती लॉबीने रचले आहे. या प्रकरणी गुजरात मॉडेल जबरदस्त पद्धतीने पुढे जात आहे.
सरकारनेच प्रकल्प हाती घ्यावा
उद्योगपती गौतम अदानी भाजपचे जावई आहेत. त्यामुळे भाजपने संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावाने केला आहे. धारावीत गरीब लोकांची घरे व व्यवसाय आहेत. त्यांना तिथेच जागा मिळाली पाहिजे. सरकारने हा प्रकल्प अदानींच्या घशात घालण्यापेक्षा स्वतःच त्याठिकाणी संयुक्त उपक्रम राबवावा, असे संजय राऊत म्हणाले.
आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रयत्न
गत काही काळापासून गुजरातमध्ये सातत्याने ड्रग्जच्या खेपा येत आहेत. त्यानंतर ते महाराष्ट्रात येत आहे. आता ते अख्खी धारावी अशा लोकांच्या हातात देत असतील तर संपूर्ण मुंबईत ड्रग्जचा व्यापार सुरू होण्याची भीती आहे. धारावीच्या पोरांना ड्रग्जच्या पुड्या विक्री करताना पहायचे आहे का? हा धारावीतील जनतेच्या तोंडाला पाने पुसून आवळा देवून कोहळा काढण्याचा प्रयत्न आहे. हा मुंबई विकण्याचा प्रयत्न आहे. देशातील सर्वात मोठा टीडीआर घोटाळा कुठे सुरू असेल, तर तो धारावी पुनर्विकास प्रकल्पा होत आहे, असा दावाही संजय राऊत यांनी यावेळी राज्य व केंद्र सरकारवर निशाणा साधताना केला.

