अकोला-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी शनिवारी विजयादशमीच्या दिनी रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी करून एकच खळबळ उडवून दिली आहे. एवढेच नाही तर त्यांनी रावणाच्या मंदिरासाठी तब्बल 20 लाख रुपयांचा निधी देऊन, रावणाने माता सीतेचे बाप म्हणून अपहरण केल्याचा वादग्रस्त दावाही केला आहे. त्यांच्या या विधानाचे राज्याच्या राजकारणात तीव्र पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.
राज्यासह संपूर्ण देशात आज विजयादशमीचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. या निमित्ताने देशात ठिकठिकाणी रावण दहन केले जाते. या पार्श्वभूमीवर आमदार अमोल मिटकरी यांनी आज अकोला जिल्ह्यातील सांगोळा येथे रावणाची महाआरती केली. यावेळी गावकऱ्यांसह आदिवासी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मिटकरी यांनी रावण दहनाची प्रथा बंद करण्याची मागणी केली.
रावण हा ज्ञानी व सत्पुरुष होता,रावणाला जाळणारे रामासारखे पवित्र आहेत का?
रावणाला जाळणारे रामासारखे पवित्र आहेत का? रावण हा ज्ञानी व सत्पुरुष होता. पण त्याच्यातील चांगुलपणाकडे समाजाने दुर्लक्ष केले. रावणाने माता सीतेचे एका बापाच्या भूमिकेतून अपहरण करत तिला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मागच्या वर्षी रावण मंदिराच्या जिर्णोद्धाराचा निर्णय घेतल्यानंतर मला प्रचंड राजकीय अडचण झाली. त्यामुळे मला तो निर्णय मागे घ्यावा लागला. पण आता मी विविध सामाजिक संघटनांच्या मदतीने जिर्णोद्धाराचा प्रयत्न करणार आहे, असे अमोल मिटकरी म्हणाले.
उल्लेखनीय बाब म्हणजे अमोल मिटकरी यांनी गतवर्षी रावण मंदिराच्या सभागृह व जिर्णोद्धारासाठी 20 लाख रुपयांचा निधीही जाहीर केला होता. पण त्यावरून प्रचंड आकांडतांडव झाले होते. त्यानंतर आज पुन्हा मिटकरी यांनी सांगोळ्यात रावणाची आरती केल्यानंतर रावण दहनाच्या प्रथेवर बंदी घालण्याची मागणी केली. त्यांच्या या मागणीवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यातील काही आदिवासी संघटनांनी यापूर्वीच रावण दहनाला विरोध केला आहे.
सांगोळ्याच्या रावण मंदिराची काय आहे आख्यायिका?
अकोला शहरापासून अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर सांगोळा हे गाव आहे. इथे रावणाच्या सद्गुणांमुळे त्याची पूजा केली जाते. मागील 300 वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. वाईट ते सोडावे व चांगले ते घ्यावे, अशी आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. दशानन रावणात अनेक दुर्गुण होते. पण त्याच्यात काही चांगले गुणही होते. याच गुणांच्या समुच्चयाने त्याची पूजा सांगोळ्यात करण्यात येते.
सांगोळा येथे रावणाची दगडात कोरलेली मूर्ती आहे. दसऱ्याच्या दिवशी या मूर्तीची पूजा केली जाते. या गावातून मन नदी वाहते. या नदीच्या काठावर ऋषीमुनीचे आश्रम होते. गावकऱ्यांची ऋषीमुनीवर खूप श्रद्धा होती. काही कालावधीनंतर मुनी कालवश झाले. गावकऱ्यांनी महाराजांची आठवण मूर्तीच्या रुपेने संवर्धन करण्याचा निर्णय घेतला होता. महाराज ज्या वडाच्या झाडाखाली तपस्या करत होते. त्या वडाच्या झाडाखाली मुनी तपस्या करत असल्याची मूर्ती तयार करण्याची सूचना त्यांनी मूर्तीकाराला केली. पण मूर्तिकाराच्या हातून मुनीच्या ऐवजी रावणाची मूर्ती तयार झाली. तेव्हापासून सांगोळा येथील गावकरी 10 तोंडे, 20 डोळे, सर्व आयुधांनी सूसज्ज असणाऱ्या 20 हातांच्या रावणाची पूजा करत आहेत.

