पुणे : महाराष्ट्र सरकार तर्फेनव्याने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्षपदी शेखर मुंदडा यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर गोसेवा क्षेत्रात विविध प्रकारचे उल्लेखनीय कार्य व शासन निर्णय देखील झाले. नुकतेच, शेखर मुंदडा यांना राज्यमंत्री पदाचा दर्जा दिल्याचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.
शेखर मुंदडा म्हणाले, दिवसेंदिवस देशी गाईच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. विसाव्या पशुगणनेमध्ये देशी गोवंशीय पशुधनाची संख्या २०.६९ टक्क्यांनी कमी झाली आहे. भारतीय उष्णकटिबंधीय हवामान टिकून राहण्याची क्षमता आणि रोगप्रतिकारशक्ती यामुळे देशी गोवंशीय पशुधनाचे जतन व संवर्धन करणे आवश्यक आहे. त्यामुळे देशी गोवंशीय संगोपन करणाऱ्या गोशाळेतील प्रत्येक देशी गोवंशसाठी प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान शासनातर्फे देण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात नोंदणीकृत ८२८ गोशाळा असून त्यामध्ये एक लाख २३ हजार ३८९ पशुधन आहे. यामधील देशी गोवंशाच्या पोषणासाठी प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येणार आहे. गो सदन, पांजरपोळ व गोरक्षण संस्था यांसह एक वर्षाचा गोसंगोपनाचा अनुभव असलेल्या संस्थांना बळकट करण्यासाठी आणि देशी गो संगोपनासाठी त्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले, देशी गोमातेला भारतीय संस्कृतीत वैदिक काळापासून महत्व आहे. आहारातील उपयुक्तता, आयुर्वेद चिकित्सा, पद्धती पंचगव्य उपचार पद्धती, तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत असलेले महत्त्वाचे स्थान लक्षात घेऊन देशी गाईला राज्यमाता घोषित करण्यात आले आहे. त्यामुळेच या देशी गाईंची जबाबदारी देखील शासनाने घेतली असून नोंदणीकृत गोशाळांमधील प्रत्येक देशी गोवंशाला प्रतिदिन पन्नास रुपये पोषणासाठी दिले जाणार आहेत. जेणेकरुन गोवंशीय पशुधनात वाढ होईल. गोवर्धन गोवंश योजने अंतर्गत १५ ते २५ लाख रुपये प्रत्येक तालुक्यात एक असे ३२४ तालुक्यात दिली आहे.

