पुणे-अॅम्ब्युनिअस फॅब्रिकेशन कंपनीसाठी पैशाची गरज असल्याचे सांगून बाफना माेटार कंपनी व रिअल इस्टेटच्या व्यवसायातून गुंतवणुकीवर दीडपट रक्कम परत देताे असे अमिष दाखवून व्यवसायिकाची सात काेटी एक लाख रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी नामांकित बाफना माेटार कंपनीचे संचालक सुमतीप्रसाद मिश्रीलाल बाफना (रा.मरीन ड्राईव्ह, मुंबई) यांच्यावर लष्कर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सुनिल सुमतीलाल मुथ्था (वय-64,रा.घाेरपडी,पुणे) यांनी आराेपी विराेधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आराेपी हे एकमेकांचे आेळखीचे असून साेबत व्यवसाय करतात. बाफना हेल्थ केअर प्रा.लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली असून त्यात संचालक म्हणून समान भागीधारक आहे. सदर कंपनीत अॅम्ब्युनिअस फॅब्रिकेशनचे काम त्यांनी सुरु केले असून आराेपींना पैशाची गरज हाेती. त्यामुळे त्यांनी तक्रारदार यांच्याकडून रक्कम मागून दिलेल्या रकमेवर बाफना माेटार कंपनी व रिअल इस्टेटच्या माध्यमातून दीडपट रक्कम परत देण्याचे ताेंडी आश्वास दिले.
त्यावर तक्रारदार यांनी विश्वास ठेऊन त्यांनी धनराज छगनलाल अँड कंपनी व तक्रारदार यांचे व्यैक्तिक खाते व सुनेच्या बँक खात्यावरुन एकूण सात काेटी एक लाख रुपये आराेपींना दिले. त्यानंतर त्यांनी वारंवार आराेपींना फाेन करुन मुद्दल व परतावा मिळण्यासाठी बाेलले. परंतु आराेपींनी पैसे देण्यास टाळाटाळ करुन ‘ज्यादा हुशारी कराे मत , नही ताे मे आपके पिछे गुंडाेकाे लगा दुंगा आैर आपका जीना मुश्किल कर दुंगा ’ असे म्हणत त्यांचा फाेन कट केला. तसेच आजपर्यंत गुंतवणुक रक्कम परत न करता तक्रारदार यांचा फाेन व व्हाॅटसअप मेसेज ब्लाॅक केले आहे. याबाबत पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एन कणसे करत आहे.

