जीएसबी संयुक्त कोंकणी सभा आयोजित शारदोत्सवात पंडित शौनक अभिषेकी यांची स्वरसेवा
पुणे : ‘आधी रचिली पंढरी’, ‘भवानी दयानी जननी’, ‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’, ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ असे प्रसिद्ध अभंग आणि भक्तीरचना सादर करून पंडित शौनक अभिषेकी यांनी देवी शारदेच्या चरणी आपली स्वरसेवा रुजू केली. भक्तीमय वातावरणात भावविभोर झालेल्या रसिकांनी पं. अभिषेकी यांना भरभरून दाद देत मैफलीचा आनंद घेतला.
जीएसबी संयुक्त कोंकणी सभा, पुणे यांच्यातर्फे प्रथमच शारदोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून पंडित शौनक अभिषेकी यांच्या स्वराभिषेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शारादोत्सव मजेंटा लॉन्स, डी. पी. रोड, राजाराम पुलाजवळ, कर्वेनगर येथे आयोजित करण्यात आला आहे. राजगोपाल गोसावी (तबला), उदय कुलकर्णी, (संवादिनी), अतुल गरुड (टाळ), अभेद अभिषेकी, राज शहा (सहगायन) यांनी साथसंगत केली. कलाकारांचा सत्कार बिपिन पंडित यांनी केला.
सकाळच्या सत्रात अभिषेक, राम नाम जप आणि धार्मिक विधी झाले.
पंडित शौनक अभिषेकी यांनी आपल्या गायनाची सुरुवात ‘शांताकारम् भुजग शयनम्’, ‘सर्व मंगल मांगल्ये’ या आदिशक्तीच्या आळवणीने केली. त्यानंतर वारकरी संप्रदायात सादर केला जाणारा ‘जय जय रामकृष्ण हरी’ हा जयघोष करत रसिकांनाही सहभागी करून घेतले. संत नामदेव रचित ‘आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी’ हा अभंग बहारदारपणे सादर केला. शास्त्रीय संगीत सादर करताना पंडित अभिषेकी यांनी पंडित रामाश्रय झा यांनी रचलेली ‘भवानी दयानी जननी’ ही रचना प्रभावीपणे सादर करून त्याला जोडून तराणा ऐकविला. ‘नाही पुण्याची मोजणी, नाही पापाची टोचणी’ ही संतरचना सादर केल्यानंतर संत सोयराबाई रचित ‘हरि भजनावीण काळ घालवू नको रे…’ ही रचना भावपूर्णतेने सादर केली. ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ या संत चोखामेळा रचित अभंग सादरीकरणाला रसिकांनी टाळ्यांच्या गजरात साथ केली. ‘सर्वात्मका सर्वेश्वरा’ आणि ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या भैरवीतील प्रसिद्ध रचना सादर करून पंडित अभिषेकी यांनी रसिकांच्या मनात आपले सुरेल स्वर निनादत ठेवले. पंडित शौनक अभिषेकी यांनी ‘गोयंचे नाव व्हड करून ल्हान जाले म्हान, बनखणीची देवळा जाली लामण दिवे प्राण’ आणि ‘त्या दिसा वडा कडेन गडद तीनसना, मंद मंद वाजत आयली तुजी गो पायंजणा’ या कवी बा. भ. बोरकर यांच्या कोकणी कविता सादर केल्या .
भजनसंध्येनंतर पुणेकरांनी पारंपरिक रासगरबाचा आनंद घेतला.
जीएसबी संयुक्त कोंकणी सभेचे अध्यक्ष अरुण किणी, उपाध्यक्ष जनार्दन भट, सचिव मंजुनाथ नायक, खजिनदार बिपिन पंडित महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करीत आहेत.