पुणे : संजय काकडे अपक्ष म्हणून राज्यसभेवर गेल्यावर त्यांनी सहयोगी सदस्य बनून भाजपच्या राजकारणात प्रवेश केला.गेली दहा वर्षे संजय काकडे भाजपचे सहयोगी सदस्य आहेत,मोर्चा,सभा,निवडणुका अशा विविध स्तरावर त्यांनी आपली जबाबदारी मोठ्या हिकमतीने पार पडून पक्षाला वेळोवेळी बहुमोल मदत केल्याचे कोणी नाकारणार नाही.पण आता हेच संजय काकडे भाजपने आपल्यासाठी मात्र काही केले नाही म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या मार्गावर असल्याच्या काही माध्यमातील वृत्ताने पुण्याच्या राजकारणात चर्चेला बहर आला आहे. विशेष म्हणजे भाजपच्याच अनेक माजी नगरसेवकांच्या आशा काकडे यांच्यामुळे एका वेगळ्याच दिशेने पल्लवित होऊ पाहत आहेत.
एकीकडे विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी भाजपाला मागोमाग धक्के देण्यास सुरुवात केली. हर्षवर्धन पाटील यांच्यानंतर आता पुण्यातील भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. असे वृत्त काही माध्यमांनी दिले आहे.दसऱ्यानंतर ते अधिकृत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल होणार आहेत असेही या वृत्तात म्हटले आहे,हे जर खरे ठरले तर मात्र भाजपला मोठा धक्का बसणार आहे हे सांगायला कोणत्या ज्योतिषाची गरज उरणार नाही.
भाजपानं काकडे यांचा वापर केला असा प्रचार माध्यमातून होतो आहे तो खराही आहेच,आणि आता मराठा समाज देखील जरांगे यांच्या आंदोलनाने विचारात पडू लागला आहे.या पार्श्वभूमीवर काकडे यांनी जर भाजपा खरोखर सोडून पावरंना साथ दिली तर विधानसभा आणि नंतर महापालिका अशा दोन्ही निवडणुकात त्यांची चुणूक दिसल्याशिवाय राहणार नाही. पण काकडे हे देवेंद्र फडणवीस यांचे आणि अमित शहा यांच्या नजीकचे सहकारी मानले जातात ते या राजकीय हालचाली करतील काय ? हे येणारा काळच स्पष्ट करणार आहे हे निश्चित.
दरम्यान त्यांचे समर्थक मानले जाणारे माजी नगरसेवक शंकर पवार यांनी पर्वती विधानसभा मतदार संघातून आपली इच्छुकता दर्शविली आहे . स्थायी समिती अध्यक्ष,महापौर,खासदार आणि थेट केंद्रीय मंत्री झालेल्या मुरलीधर मोहोळ यांच्या वेगवान कारकीर्दीमागे नशिबाची साथ जरी मानली जात असली तरी या मुळे असंख्य नगरसेवकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.आणि अमोल बालवडकर यांच्या सारख्या नगरसेवकाने देखील कोथरूड मधून चंद्रकांत दादांच्या विरोधात शड्डू ठोकायला सुरुवात केली आहे. नशिबाने मिळत नसेल तर प्रयत्नांनी,मेहनतीने का मिळविण्याचा प्रयत्न का करू नये असा एक सूर भाजपच्या अनेक नगरसेवक मंडळीत उमटू लागला आहे एकीकडे बालवडकर यांनी चंद्रकांत पाटलांच्या विरोधात तयारी सुरु केली आहे तर दुसरीकडे विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या विरोधात जाऊन त्यांच्या पर्वती विधानसभा मतदार संघात श्रीनाथ भिमालेंनी आपला प्रचारही सुरु केला आहे.आणि खडकवासल्यातून भीमराव तापकीर यांनाही ताप दिला जाऊ लागला आहेच.
या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेचे देखील आखाडे बांधत संजय काकडे यांच्या मागे मराठा आणि बहुजन समाजाचा स्थानिक नेता स्तरावरील मोठा वर्ग उभा राहिल्यास नवल वाटणार नाही.आणि ज्याचा तोटा निश्चितच भाजपला होईल असे कार्यकर्त्यांकडून बोलले जाते आहे.

