जाधवर इन्स्टिटयूटसच्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळा प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या हिंदीतील आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : लोकमान्य टिळक, आगरकर, चिपळूणकर यांची नावे पुण्यात शिक्षण क्षेत्रात संस्था सुरु करण्यात घेतली जातात. मात्र, काही वर्षात पुण्याबाहेरून आलेले संस्थांचालक शिक्षण क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात करीत आहेत. यांच्या योगदानाने विदयेच्या माहेरघराची परंपरा कायम राखली जात आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटस् च्या १० व्या वर्धापनदिनानिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल, मानाजीनगर, न-हे येथे करण्यात आले. कार्यक्रमाला महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा हे अध्यक्षस्थानी होते. तर, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांच्या हिंदीतील आत्मचरित्रपर पुस्तकाचे प्रकाशन कार्यक्रमात झाले.
यंदाचा जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक डॉ.सदानंद मोरे यांना, ज्येष्ठ बँकिंग तज्ञ अॅड.सुभाष मोहिते यांना सहकार क्षेत्रातील पुरस्कार, कर्नल विनोद मारवाह यांना शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार, उद्योग क्षेत्रातील पुरस्कार काका हलवाई ग्रुपचे युवराज गाडवे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
शेखर मुंदडा म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात होणारी वृद्धी, विकास आणि यश यामध्ये फरक आहे. केवळ वृद्धी नाही तर शिस्त, मानवता, संस्कार ही जीवनात महत्वाचे असतात. मला आयुष्यात केवळ वृद्धी मिळविण्यापेक्षा यशस्वी आयुष्य जगायचे होते, त्यानुसार मी सामाजिक जीवनात देखील वाटचाल केली. जीवनात चांगले कार्य करीत सकारात्मकता असायला हवी. तसे जीवन प्रत्येक व्यक्तीने व्यतीत केल्यास नक्कीच यश मिळू शकेल.
अॅड.सुभाष मोहिते म्हणाले, शिक्षण संस्था चालविणे हे सोपे काम नाही. केवळ शैक्षणिक संस्थेचा विचार करण्यापेक्षा समाजाचा व देशाचा विचार करणे ही धारणा निर्माण करणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षणाचा बाजार झाला आहे, ही केवळ चर्चा ऐकतो. आता केवळ पदवी घेऊन उपयोग नाही, तर कौशल्याधिष्ठित शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्याने घेणे ही गरज निर्माण झाली आहे.
कर्नल विनोद मारवाह म्हणाले, आपण स्वतःवर विश्वास ठेवायला हवा. मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न देखील प्रत्येकाने करायला हवा. त्यासाठी आपला विचार पक्का असणे गरजेचे आहे. समाजमाध्यमे ही आपला वेळ वाया घालविण्याची माध्यमे आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून सकाळी लवकर उठून अभ्यास व आपली कामे करायला हवीत.
अॅड. शार्दुल जाधवर म्हणाले, अग्निशमन दल, पोलीस, पत्रकार, सैन्यदल आणि रुग्णवाहिका चालकांच्या मुलांना केजी ते पीजी पर्यंतच्या शैक्षणिक शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येते. तसेच ८५ टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणा-या विद्यार्थ्यांनी संस्थेत प्रवेश घेतल्यास शैक्षणिक शुल्कात १५ टक्के सवलत शिष्यवृत्तीच्या रुपात दिली जाते. विद्यार्थ्यांना परिपूर्ण शिक्षण देत त्यांना समाजातील प्रेरणादायी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळावे, यादृष्टीने विविध उपक्रमांच्या माध्यमातून संस्थेचे प्रयत्न सुरु असतात, असेही ते म्हणाले. युवराज गाडवे यांनी मनोगत व्यक्त केले.
पुण्याबाहेरून आलेल्या संस्थाचालकांमुळे विदयेच्या माहेरघराची परंपरा कायम- ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे
Date:

