आरोपींच्या शोधासाठी १० लाखाचे बक्षीस ठेवावे लागले ..याचे कारण काय ?
पुणे- महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी NCRB च्या अहवालाचा दाखला देत महिला त्याचार आणि एकूणच गुन्हेगारी नाकारल्याचे दर्शविणारे वक्तव्य प्रसिद्ध झाले आहे . अजितदादा गटात सामील झालेल्या चाकणकर यांनी , अजितदादांनी सुप्रिया विरुद्ध सुनेत्राला उभे केले हि चूक झाली असा दिलेला कबुली जबाब देखील अद्याप लक्षात न घेता सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेचा भडीमार सुरूच ठेवला आहे .याबाबतचे प्रकरण आणि विषय आहे तो बोपदेव घाटात झालेल्या सामुहिक बलात्काराचा ….
कोंढवा परिसरात सासवडकडे जाणाऱ्या बोपदेव घाटामध्ये ६ दिवसांपूर्वी मध्यरात्री बारा वाजता एका २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीवर तीन जणांनी कोयत्याचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्या धक्कादायक प्रकार घडला होता.याप्रकरणात आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची तब्बल ६० पथके कार्यरत आहेत. ५० हजार मोबाइलचा डाटा पोलिसांनी आतापर्यंत स्कॅनिंग केला असून येरवडा कारागृहातील काही कैद्यांकडे देखील गुन्ह्याबद्दल काही माहिती आहे का याची चौकशी केली. मात्र, त्यानंतरही सामूहिक बलात्कार गुन्ह्यातील आरोपींचा थांगपत्ता अद्याप पोलिसांना लागलेला नाही.त्यामुळे आरोपींच्या शोधासाठी , माहितीसाठी पोलिसांनी १० लाखाचे बक्षीसदेखील ठेवले आहे
या घटनास्थळावर मंगळवारी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलिसांकडून घटनेची माहिती घेतली. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे. आपला हा देखावा कशासाठी? असा सवाल करत पुण्यात असुनही स्वत:च्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले, असे म्हणत चाकणकर यांनी सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे.
सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांसोबत बोपदेव घाटातील घटना घडलेल्या जागेची पाहणी केली. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी घाट परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश पोलिसांना दिले, असे सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटले होते. सुप्रिया सुळेंच्या घटनास्थळाच्या पाहणीवरुन रुपाली चाकणकरांनी टीका केली. झोपी गेलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना नाही, असा टोला सुप्रिया सुळे यांना लगावला आहे.
संबंधित घटनेला घडून पाच दिवस झाले, पुण्यात असूनही स्वतःच्या मतदारसंघात घडलेल्या घटनेला भेट द्यायला बरेच दिवस गेले, मुळातच पोलिसांनी पहिल्या दिवसापासून 12 टीम तयार करून युद्धपातळीवर तपास करीत आहेत. मग आपला हा देखावा कशासाठी? आपल्या माहितीसाठी, चंद्रपुरमध्ये कोरपना येथे 12 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारा शिक्षक हा युवक काँग्रेसचा शहराध्यक्ष आहे, याविरोधात आंदोलन कधी करणार?, असेही चाकणकर म्हणाल्या.
आपल्या सोशल मीडियाच्या प्रदेश सरचिटणीसवर महिलांचे अश्लील व्हिडीओ बनविणे, पाठवणे, अश्लाघ्य कमेंट करणे यासाठी चार सायबर गुन्हे दाखल आहेत, पोलिस कोठडीही घेऊन आलेल्या या आरोपीला आपण नियुक्तीपत्र देता, नक्की कशाचे समर्थन करता? त्याच्याविरोधात आंदोलन कधी करणार? कालच नगरमध्ये भानुदास मुरकूटेंवर लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला, जे आपल्यासोबतचे पदाधिकारी आहेत, यांच्याविरोधात आंदोलन, पत्रकार परिषद कधी घेणार? असा सवाल चाकणकरांनी विचारला आहे. झोपी गेलेल्याला जागे करता येते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्यांना नाही, म्हणून आपल्या माहितीसाठी NCRB चा काल प्रकाशित झालेला अहवाल देत आहे, असे म्हणत रुपाली चाकणकरांनी सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल केला आहे.

