बारामती-मला राजकीय भूमिका घ्यावी लागली ती साहेबांना विचारून घेतली. ते सुरुवातीला हो म्हणाले परत म्हणाले की ही, भूमिका मला घेता येणार नाही. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, मला कोणालाही दुखवायचं नव्हते, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात घरातील उमेदवार देणं ही माझी चूक मी आधी मान्य केली होती आणि आताही मान्य करतो. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत आम्ही राजकारणात पुढे आलो, हे सगळे होत असताना परिवार म्हणून एक असल्याने त्रास झाला नाही पण आता दोन वेगळे पक्ष झाले. बारामतीमधील भाषणात त्यांनी हे विधान केले आहे.
अजित पवार म्हणाले की, मी मधल्या काळात पक्क ठरवले होते की बास झाले आता… पण कधी ना कधी थांबावे लागते, पण लोकांच्या रेट्यापुढं काही गोष्टी कराव्या लागतात. आजपर्यंतचा तुम्हाला अनुभव त्यासंदर्भात मी पुन्हा विचार करायला लागलो आहे.
दुसरे कुणी नको. तुम्हीच बारामतीतून विधानसभा लढा, असा आग्रह करत अजित पवारांच्या समर्थकांनी मंगळवारी त्यांचाच ताफा बारामतीमध्ये रोखला. जोरदार घोषणाबाजीही केली. त्यानंतर तुमच्या मनातला उमेदवार देतो, असे म्हणत दादांनी स्वत:ची सुटका करून घेतली. लोकसभेतील दारुण पराभवानंतर अजित पवारांनी बारामती विधानसभेमधूनही काढता पाय घेण्याचे संकेत वारंवार दिले आहेत. कारण शरद पवारांनी येथून अजितदादांचा पुतण्या युगेंेद्र पवारला मैदानात उतरवण्याचे निश्चित केले आहे. त्याच्याकडून पराभवाची भीती दादांना वाटत आहे. म्हणूनच त्यांनी ‘मी बारामतीतून तीन वेळा आमदार होतो, खासदारही होतो, अशा वेळेला दुसऱ्याला संधी द्यायला हवी. मी जो उमेदवार देईन त्याला तुम्ही निवडून द्यायचं’, असे दोन आठवड्यांपूर्वी म्हटले होते.
त्यावर गेले काही दिवस समर्थकांकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, मंगळवारी दुपारी या समर्थकांनी अजित पवारांचा ताफा रोखला. ‘एकच वादा, अजितदादा’ अशी घोषणाबाजी केली. आजच्या आज बारामतीचा उमेदवार जाहीर करा, असे म्हणत समर्थक हट्टाला पेटले होते. बारामतीमधून तुम्हीच लढा. बारामतीमधील आमच्या मनातील उमेदवार तुम्हीच आहात, अशा विनवण्या करत त्यांनी रस्त्यातच ठिय्या मांडला होता. मग अजितदादा गाडीतून बाहेर आले आणि तुमच्या मनातला उमेदवार मी देईन, असे आश्वासन देऊन ते निघून गेले.