पुणे : कॅब दरवाढीसाठी मागील एका वर्षापासून दिनांक ९ सप्टेंबर २०२३ पासून सातत्याने पाठपुरावा करुनही कोणतीही कार्यवाही झाली नसून आरटीए, पुणे यांनी निश्चित केलेले टॅक्सीचे दर पत्रक आजपर्यंत अंमलात आणलेले नाही. ते त्वरीत अंमलात आणावे, या मागणीसह अन्य मागण्यांसाठी मॉं साहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) पुणे समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
यावेळी माँसाहेब कॅब संस्था महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष वर्षा शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोठया संख्येने कॅब चालक उपस्थित होते.
वर्षा शिंदे पाटील म्हणाल्या, पुणे आरटीए ने निश्चित केलेले दर पत्रक सर्व कंपन्यांना लागू करावे, ज्या मुजोर कंपन्या आरटीए प्रमाणे दर लागू करणार नाहीत, त्या कंपन्यांचे अॅप मोबाईल प्ले स्टोअर वरुन काढून टाकावे, गोवा राज्यासारखे पुण्यात देखील टॅक्सी मीटर द्यावे, एव्हरेस्ट प्लीट ई-कॅब बंद कराव्या आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणा-या पांढ-या प्लेट च्या गाडया बंद कराव्या, अशा मागण्या आम्ही आरटीओ यांच्याकडे करीत आहोत.
त्या पुढे म्हणाल्या, सर्व मागण्यांकरिता दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी पुण्यातील ९ हजार कॅब चालकांनी व मालकांनी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी आठ दिवसात निर्णय घेऊ, असे सांगण्यात आले. मात्र, आजपर्यंत कॅब चालक व मालकांना न्याय मिळालेला नाही. प्रशासनाने याकडे गांभिर्याने लक्ष न दिल्यास संघटनेचे ५ हजार सभासद रस्त्यावर उतरुन आंदोलन करतील. काही अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल, असा इशाराही वर्षा शिंदे पाटील यांनी दिला.
- सीएनजी चे दर वाढले तरी देखील गाडी भाडे तेवढेच
ड्रायव्हर हा एक दुर्लक्षित घटक आहे. सन २०१४ ला सीएनजी चा दर हा ४३ रुपये होता आणि गाडी भाडे हे ९ ते १० रुपये किलोमीटर होते. आज २०२४ मध्ये सीएनजी चा दर ९९ रुपये आहे. तरी देखील गाडी भाडे हे ९ ते १० रुपये किलोमीटर आहे. बाजारामध्ये वस्तूंचे दर वाढत आहेत. मात्र, चालक-मालकांच्या गाडीभाड्यामध्ये कधीच वाढ होत नाही. यांच्याकडे सरकारचे का दुर्लक्ष होत आहे ? हे या देशाचे नागरिक नाहीत का ? असा प्रश्नही वर्षा शिंदे पाटील यांनी उपस्थित केला.

