निसर्ग छाया यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी नवरात्रीनिमित्त विशेष आयोजन
पुणे : आयुष्यभर मुलांसाठी जगताना ते स्वत: मात्र जगणे विसरुन जातात. आयुष्याच्या उत्तरार्धात येता येता स्वत:साठी जगायला वेळ तर मिळतो, परंतु शारीरीक मर्यादा ही येतात. अशा वेळी विविध व्याधींमुळे सगळ्यांसोबत बाहेर गर्दीमध्ये जाऊन उत्सवाचा आनंद घेता येत नाही. अशा समवयस्क ज्येष्ठ नागरीकांसाठी नवरात्रीनिमित्त विशेष गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. आयुष्याची सायंकाळ आनंदाने जगू पाहणाऱ्या ज्येष्ठांनी कार्यक्रमात दांडिया मनमुराद आनंद लुटला.
निसर्ग छाया संस्थेच्या वतीने भूगाव येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी भव्य गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, संस्थेच्या संचालिका अमृता देवगावकर, मंदार देवगावकर, जयंत दशपुत्रे, मकरंद टिल्लू आदी उपस्थित होते.
नगाड़ा संग ढोल बाजे…सबसे बडा तेरा नाम शेरोवाली… ढोलीडा… ‘उड़ी उड़ी जाए’… पंखीडा… सनेडो…पंखिडा ओ पंखिडा… रंगीलो म्हारो ढोलना या गाण्यांवर दांडिया खेळण्याचा मनमुराद आनंद ज्येष्ठ नागरिकांनी लुटला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, पोटानंतर, मनाची आणि त्यानंतर बुद्धीचा भूक असते. या सगळ्यानंतर आत्म्याची भूक निर्माण होते. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात ज्येष्ठ नागरिकांनी हताश होऊन न बसता, बाहेर पडून आयुष्याचा मनसोक्त आनंद घ्यायला हवा.
अमृता देवगावकर म्हणाल्या, ज्येष्ठ नागरिकांना नवरात्रीमध्ये बाहेर गर्दीत जाऊन दांडिया खेळण्याचा आनंद घेता येत नाही. त्यामुळे त्यांना त्यांच्या पद्धतीने मनसोक्त आनंद घेत आपल्याच वयाच्या मित्रमैत्रिणींसोबत दांडिया गरबा खेळता यावा यासाठी या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.