ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस ; श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे लेखिका-कवयित्री यांचा सन्मान सोहळा
पुणे : भारतातील वातावरण अशुद्ध झाले आहे. धर्म व्यवस्था विस्कळीत झाली आहे. राजकारण भ्रष्ट, समाजकारण आंधळे आणि दिशा चुकलेला धर्म अशी समाजव्यवस्था झाली आहे. ही परिस्थिती बदलायची असेल तर नारीशक्ती ने घरापुरते राहून चालणार नाही. त्यांना विश्वाचा नकाशा डोळ्यासमोर ठेवावा लागेल. आज विश्व आणि विश्वाची मानवता धोक्यात आहे. युद्धाच्या संघर्षाच्या वातावरणात मानवता भयभीत झाली आहे. धर्म तर माणसाला जगवतो परंतु आज धर्म हा माणसाच्या मरणासाठी कारणीभूत ठरतो आहे. असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अगरवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवात लेखिका-कवयित्री यांचा सन्मान सोहळा पार पडला. यावेळी माजी पोलीस महासंचालक जयंत उमराणीकर, ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अगरवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अगरवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अगरवाल, डॉ. तृप्ती अगरवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर उपस्थित होते. इंदुमती जोंधळे, सुनीताराजे पवार, प्रा. नीला कदम, डॉ. ज्योती देशमुख, संगीता पुराणिक, डॉ. श्रुती पानसे, अश्विनी साने, ॲड. आकांक्षा पुराणिक, नताशा शर्मा यांचा सन्मान या वेळी करण्यात आला.
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, जगातील अर्धी जनता नारीशक्ती आहे. तिला देवीचे रूप आपण दिले आहे. नारीला ग्रंथामध्ये गोंजारले, मंदिरामध्ये गोंजारले परंतु घरामध्ये मात्र तिला अत्यंत दुर्दैवी करून ठेवलेले आहे. रस्त्यावरती तिची लक्तरे काढलली आहेत ही लाजीरवाणी गोष्ट आहे. अजूनही माणसांमध्ये पशुत्व कायम असेल आणि अजूनही रानटी माणूसच शिल्लक असेल तर मग पुन्हा एकदा आपल्याला सर्व संस्कृतीची सुरुवात करावी लागेल. यासाठी साहित्य, विज्ञान, शिक्षण, धर्म आवश्यक आहे. असेही त्यांनी सांगितले. घर आणि शाळा या संस्काराचे केंद्र झाले पाहिजेत. मुलांच्या संस्काराची जबाबदारी शेवटपर्यंत आई-वडिलांचीच असते. ज्या समाजाचे चारित्र्य अव्वल असते त्या देशाचे भवितव्य अव्वल असते.
कालीमातेचा फारसा उल्लेख आपण करत नाही पण स्त्रीमध्ये हे रुप आवश्यक आहे. आजच्या काळात तर कालीमातेचे रुप हे नारीने धारण करणे हे आवश्यकच आहे. छोट्या मुली पासून वयस्कर बायकांपर्यंत लैंगिक शोषणाच्या घटना घडत आहेत आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरेला न शोभणारी ही गोष्ट आहे.
अॅड. प्रताप परदेशी म्हणाले, ट्रस्टच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या नवरात्रोत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या नारीशक्तीचा सन्मान करून खऱ्या अर्थाने महालक्ष्मी, सरस्वती मातेची पूजा बांधण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मंदिरात नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये जी सामग्री जमते ती सर्व स्वच्छ करून कुष्ठरोग संस्था, अनाथ आश्रम, अंधशाळा यांना देण्यात येते, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे संदीप तापकीर यांनी केले. तर आभार सीईओ विशाल सोनी यांनी मानले.

