जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल आले आहेत. नॅशनल कॉन्फरन्स (NC) आणि काँग्रेस आघाडी सरकार स्थापन करणार आहेत. आघाडीला 49 जागा मिळाल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्सला 42 तर काँग्रेसला 7 जागा मिळाल्या.भाजपने 29 जागा जिंकल्या. पीडीपीला 3 जागा मिळाल्या. प्रत्येकी एक जागा आम आदमी पार्टी, जेपीसी आणि माकपला गेली. 7 अपक्षही विजयी झाले. 90 जागांच्या विधानसभेत बहुमताचा आकडा 46 आहे.
दरम्यान, नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला म्हणाले- ओमर अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरचे पुढील मुख्यमंत्री असतील. ओमर अब्दुल्ला यांनी दोन जागांवर (बडगाम आणि गंदरबल) निवडणूक लढवली आणि दोन्ही जागा जिंकल्या.
जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांचा श्रीगुफ्वारा-बिजबेहारा मतदारसंघातून पराभव झाला आहे. त्या म्हणाल्या- लोकांचा निर्णय मला मान्य आहे. दुसरीकडे, नौशेरा मतदारसंघातून पराभूत झाल्यानंतर रविंदर रैना यांनी भाजप प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत 3 टप्प्यांत 63.88 टक्के मतदान झाले. 10 वर्षांपूर्वी 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत 65% मतदान झाले होते. यावेळी 1.12% कमी मतदान झाले.