मुंबई : हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल आता समोर येत आहेत. काँग्रेसने मतमोजणीच्या सुरुवातीलाच मोठी आघाडी घेतली. मात्र तासातच चित्र उलटून भाजपने आघाडी घेतली. यावरुन काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी निवडणूक आयोगाने ( डेटा अपडेटमध्ये उशीर केल्याचा आरोप केला. आता यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी निवडणूक आयोगाला थेट गुलाम म्हटले आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीची मतमोजणीला सकाळी आठ वाजेपासून सुरुवात झाली आहे. आतापर्यंत आलेल्या कलानुसार, एकूण 90 जागांपैकी 51 जागांवर भाजप आघाडीवर असून काँग्रेस केवळ 34 मतदारसंघांमध्ये आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. तीन जागांवर अपक्ष उमेदवार आघाडीवर आहेत तर तर लोक दल 2 जागांवर आघाडीवर आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी 46 ही मॅजिक फिगर गाठायची आहे. सध्याची परिस्थिती पाहता हरियाणात भाजप (BJP) सत्ता स्थापन करेल, अशी परिस्थिती आहे.
अरविंद सावंत म्हणाले की, हरियाणामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे. ज्या पद्धतीने हे सरकार वागते आणि कोणत्याही थराला जाऊन कोणतीही गोष्ट करू शकतो. याबद्दल लोकांच्या मनात विश्वास आहे. शेतकरी आंदोलनाबाबत हे सरकारच्या निर्दयीपणे वागलेलं त्याची चीड होती. चिड असूनही त्याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर दिसत नाही. यामुळे खरं काय आणि खोटं काय हे संशयास्पद वाटत आहे. लोकांच्या मनात प्रश्न आहे की, हा निकाल असा कसा लागू शकतो, अशी टीका त्यांनी केली आहे.
ते पुढे म्हणाले की, निवडणूक निकाल ऐकून पूर्ण भाष्य करणे योग्य नाही. जयराम रमेश यांनी तक्रारी केलेल्या आहेत. त्याबद्दल गोष्टी उघडकीस येतील. निवडणुकीबाबत निश्चितच संशय निर्माण होत आहे. निवडणूक आयोग हा एक नंबरचा गुलाम आहे. त्या गुलामाकडून काय अपेक्षा करणार? असा घणाघात अरविंद सावंत यांनी केलाय. तर महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेत दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर जनतेला गाडा विश्वास आहे. विविध स्तरातील, विविध संस्थेतील लोक त्यांच्या सोबत उभी राहत आहेत, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.

