लाडकी बहिण योजनेतून बँकांच्या कारभाराने लाभार्थी संतप्त …
पुणे- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’तील बँक खात्याच्या कागदपत्रांच्या पडताळणीवरून तिघांनी एका बँक व्यवस्थापकास शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना हडपसर येथील बँक ऑफ महाराष्ट्राच्या फुरसुंगी शाखेत घडली.अक्षय अनिल रासकर, गणेश मधुकर होले आणि निखिल संजय मुळीक (तिघे रा. काळेपडळ, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी बँक व्यवस्थापक (वय ४०) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींपैकी एकाच्या पत्नीने ‘लाडकी बहीण योजने’साठी अर्ज केला होताशनिवारी (ता. ५) सकाळी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यांच्या पडताळणीचे काम सुरू होते. बँकेत काउंटरवर बरीच गर्दी होती. त्यावेळी एका आरोपीने ‘बँक व्यवस्थापक कोण आहे, तुमचे गर्दीवर काही नियंत्रण आहे की नाही,’ असे म्हणत वाद घातला. त्यावर केबिनमधून बाहेर आलेल्या शाखा व्यवस्थापकांनी ‘काय काम आहे,’ अशी विचारणा केली. त्यानंतर काही वेळाने आरोपीसह त्याच्या मित्रांनी शाखा व्यवस्थापकास शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी पसार झालेल्या तिघांना ताब्यात घेतले. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नानासाहेब जाधव करीत आहेत.

