पुणे – नाशिक नंतर आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.आपण स्वतंत्र पणे हि निवडणूक लढविणार असून, कोणाशीही युती करणार नाही याचा पुनरुच्चार करत,हरण्यासाठी, पाडण्यासाठी हि निवडणूक लढणाऱ्यानी माझ्या समोर उभे राहू नये तर केवळ जिंकण्यासाठी च्या लढाईला जे तयार आहेत त्यांना मनसेकडून उमेदवारी दिली जाईल असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील जनता सत्ता केंदित राजकारण करण्याच्या युती व आघाडीच्या वृत्तीला कंटाळली आहे, तीला मनसे हाच पर्याय वाटत आहे.तुम्ही तो पर्याय आहात ही लढाई जनता विरुद्ध आजचे आणि कालचे सत्ताधारी अशीच होणार आहे या लढाईला जिंकण्यासाठी तयार रहा.असेही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील या पदाधिकारी बैठकीत सांगितले.
आज सकाळ पासूनच संकल्प मंगल कार्यालयात राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली या बैठका सुरू होत्या.पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी या बैठकांना उपस्थित होते तर नेते शिरीष सावंत, अनिल शिदोरे,अविनाश अभ्यंकर,बाबू वागस्कर,अविनाश जाधव,अभिजित पानसे सहित सरचिटणीस बाळा शेडगे,किशोर शिंदे,अजय शिंदे,हेमंत संभुस, सचिव योगेश खैरे,शहर अध्यक्ष साईनाथ बाबर,सचिन चिखले सहित ग्रामीण आणि शहरातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.दोन दिवसांचा दौरा एकाच दिवसाचा करत दुपारपर्यंत पश्चिम महाराष्ट्र, पुणे जिल्हा व पुणे शहरातील विधानसभा मतदारसंघांच्या बैठका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी ४ वाजताच मुंबईला रवाना झाले.मुंबईत १३ ऑक्टोबरला राज्यातील पक्षाच्या सर्व गटप्रमुखांचा मोठा मेळावा मनसेने आयोजित केला आहे. राज या मेळाव्यात निवडणूक विषयक बोलणार आहेत अशी माहिती मिळाली. सध्या त्यांचा राज्याचा दौरा सुरू आहे. राज्यातील किमान 225 ते 250 जागा लढवण्याची तयारी ते करत असल्याची चर्चा मनसे वर्तुळात आहे.