पुणे-आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी महायुतीला तिहेरी आकडाही गाठता येणार नाही. याऊलट महाविकास आघाडीला 183 हून अधिक जागा मिळतील, असा ठाम विश्वास माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला. लोकसभा निवडणुकीतील यशामुळे आमचा आत्मविश्वास दुणावल्याचेही ते यावेळी म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार समीरण वाळवेकर यांनी सोमवारी निगडी प्राधिकरण येथील ग. दि. माडगूळकर सभागृहात पृथ्वीराज चव्हाण यांची मुलाखत घेतली. यावेळी बोलताना त्यांनी उपरोक्त दावा केला. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 31 जागा मिळाल्या. याचा अर्थ आम्ही तब्बल 65 टक्के जागा जिंकल्या. या गोष्टीचा विचार केला, तर विधानसभा निवडणुकीत आम्हाला 183 जागा मिळतील. याऊलट सत्ताधारी महायुतीला तिहेरी आकडाही गाठता येणार नाही अशी स्थिती आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी महाराष्ट्रातील सामाजिक वातावरण चिंताजनक झाल्याचाही दावा केला. ते म्हणाले, राज्यात बारा बलुतेदार समजा, मराठा समाज, दलित समाज आदी सर्वचजण खेळीमेळीच्या वातावरणात राहत होते. त्यांच्यात केव्हाच तेढ निर्माण झाले नाही. पण आता काही राजकीय पक्ष त्यांच्यात तेढ निर्माण करत आहेत. यामुळे महाराष्ट्राचे सामाजिक आरोग्य बिघडले आहे.
दलित समाजातील बौद्ध व दलित तसेच हिंदू व दलित अशी विभागणी करून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर जातीय, धार्मिक दंगली घडवण्याचाही प्रयत्न केला जात आहे, असे ते म्हणाले.
राज्यात माझ्या नेतृत्वात सरकार असताना मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्यात आले. पण फडणवीस सरकारला ते टिकवता आले नाही. सध्या राज्यात बेरोजगारीचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. लोकांच्या हाताला काम नाही. मागच्या 10 वर्षांत एकही मोठा उद्योग किंवा कंपनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी आली नाही. जे उद्योग येत होते, ते गुजरातला पळवण्यात आले. राज्यातील वातावरण उद्योगस्नेही नाही अशी परिस्थिती जाणिवपूर्वक निर्माण करण्यात आली. यामुळे तरुणांवर बेरोजगारी कोसळली. या बेरोजगारीमुळेच राज्यात आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी बोलताना म्हणाले.

