अग्रसेन जयंती कार्यक्रमात सुप्रसिद्ध उद्योगपती संजय घोडावत यांचे प्रतिपादन
पुणे : महाराज श्री अग्रसेन हे जनतेची काळजी घेणारे एक आदर्श राजे होते. त्यांनी अहिंसा, समानता आणि समृद्धी ही तीन प्रमुख मूल्ये जपली होती. या मूल्यांचा अंगीकार केल्यास कोणत्याही समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहत नाही. अग्रवाल समाजाने काटेकोरपणे ही मूल्ये जोपासावीत, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध उद्योपती तथा घोडावत ग्रुपचे चेअरमन संजय घोडावत यांनी केले.
अग्रवाल समाज पुणे वतीने पुण्याच्या डीपी रोडवरील सिद्धी बँक्वेट्स मध्ये रविवार ६ आॅक्टोबर रोजी अग्रसेन महाराज जयंती समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. या समारोहात प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत बोलत होते.
अग्रवाल समाज पुणे अध्यक्ष ईश्वरचंद गोयल हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मंचावर समाजाचे उपाध्यक्ष विजय अग्रवाल, सचिव अमित अग्रवाल, कोषाध्यक्ष मुरलीधर चौधरी व अग्रवाल महिला संघटनेच्या अध्यक्षा भारती जिंदल आदि या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमाला केंद्रीय सहकार व नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमात सुरवातीला प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. हेमंत अग्रवाल यांनी अग्रवाल समाजाच्या विविध संघटना व क्लबची माहिती दिली. कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
आपल्या खुमासदार भाषणात संजय घोडावत पुढे म्हणाले की, जीवनात नेहमी मोठे ध्येय ठेवा. कारण मोठे ध्येय ठेवणारेच जीवनात प्रगतीच्या शिखरावर पोहोचतात. याशिवाय मोठी ध्येये गाठताना कधीही वयाचा विचार करू नका. कारण यशस्वी होण्यासाठी वयाची अट जरुरी नसते. ध्येय गाठण्यासाठी मोटिवेशन आणि इन्स्पीरेशन आवश्यक असते, परंतु सर्वांत महत्वाचे असते ते अॅक्शन. यशस्वी होण्यासाठी मागचा-पुढचा विचार न करता तत्परतेने अॅक्शन घ्या. यश नक्कीच तुमचे असेल.
मुरलीधर मोहोळ या वेळी बोलताना म्हणाले की, पुण्यात प्रत्येकच जाती-धर्माचे सण-उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरे होत असतात. ही पुण्यासाठी अभिमानाची बाब आहे. अग्रवाल समाज हा व्यवसायात आघाडीवर आहे, परंतु या समाजाने पुण्याच्या आर्थिक उन्नतीत मोठे योगदान दिलेले आहे. मला सातत्याने अग्रवाल समाजाच्या लोकांकडून मदत झालेली आहे. तुम्ही तुमचे काम केलेले आहे, त्यामुळे आता मी समाजाच्या सर्व मागण्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार आहे.
ईश्वरचंद गोयल यांनी अग्रवाल समाजातर्फे चालवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये हिंदी माध्यमाची शाळा, वैकुंठ रथ या विषयी त्यांनी सांगितले. त्यांनी या वेळी जमलेल्या अग्रवाल समाजातील नागरिकांना एकमेकांशी नाती जपण्याची व संबंध वृद्धिंगत करण्याचे आवाहन केले.
अमित अग्रवाल यांनी प्रास्ताविक करताना पुणे अग्रवाल समाज कार्यकारिणीच्या कामांची माहिती दिली. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर समाजाच्या विविध समस्यांची मांडणी केली. या समस्या लवकरच सोडवू, असे आश्वासन या वेळी मोहोळ यांनी दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक अग्रवाल आणि रितू बन्सल यांनी केले. विजय अग्रवाल यांनी सर्वांचे आभार मानले.
- सर्वोत्तम कार्य करणाऱ्यांना अग्रसेन सन्मान प्रदान
विविध क्षेत्रात कार्यरत राहून समाजाची सेवा करणाऱ्या पाच जणांना या वेळी अग्रसेन सन्मान प्रदान करण्यात आला. यामध्ये उद्योग क्षेत्रातून वसंत ग्रुपचे प्रेमचंद मित्तल, चिकित्सा क्षेत्रात सर्वोत्तम कार्यासाठी डाॅ. बालकृष्ण अग्रवाल, नेत्रदानाचे तसेच नेत्रहीन विद्यार्थ्यांसाठी कार्य करणारे सीए माखनलाल अग्रवाल, आरोग्य क्षेत्रात कार्य करणारे डाॅ. जितेंद्र अग्रवाल आणि क्रीडा क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल अजय अग्रवाल यांना हे पुरस्कार उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
— मोफतची सवय समाजाच्या उन्नतीसाठी घातक
कार्यक्रमात बोलताना संजय घोडावत यांनी मोफत या संकल्पनेवर टीका केली. त्यांनी सांगितले की, कुठलीही मोफतची सवय चांगली नाही. मोफतच्या सवयीमुळे समाज पंगू बनतो. एकीकडे देशात बेरोजगारी प्रचंड आहे, तर दुसरीकडे काम करण्यास माणसे मिळत नाहीत, हे दरी केवळ मोफत संस्कृतीमुळे फोफावली आहे. समाजाला कार्यान्वित करायचे असेल तर ही मोफत संस्कृती संपवावी लागेल.