पुणे-बजरंग दल या हिंदुत्त्ववादी संघटनेने दांडियाचा कार्यक्रम बंद पाडण्याचा प्रयत्न केल्याची घटना बारामतीत घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करत अशा संघटनांची मॉरल पोलिसिंग खपवून घेणार नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.यासंबंधीच्या वृत्तानुसार, बारामती चिराग गार्डन येथे नवरात्रोत्सवानिमित्त दांडियाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी उधळवून लावण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी वेळीच कारवाई करत त्यांचा हा प्रयत्न उधळून लावला. खासदार सुप्रिया सुळे यांनी एका ट्विटद्वारे या घटनेची माहिती दिली. तसेच अशी मॉरल पोलिसिंग खपवून घेणार नसल्याचाही इशारा दिला.
बारामती येथील चिराग गार्डन येथे नवरात्रीच्या निमित्ताने सुरु असलेला दांडियाचा कार्यक्रम बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला. बारामतीत अशा पद्धतीने गुंडगिरी कधीच झाली नाही. हे ‘मोरल पोलिसींग’ यापुर्वीही आम्ही खपवून घेतले नव्हते आणि यापुढेही घेणार नाही. अशा प्रकारचे उद्योग करणाऱ्यांवर पोलिसांनी कायद्याने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटद्वारे केली.सुप्रिया सुळे यांच्या या ट्विटनंतर पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी नवरात्रोत्सवात दांडिया व गरबा खेळण्याच्या ठिकाणी महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. एवढेच नाही तर त्यांनी नवरात्रीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी पोलिस ठाणे, गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पायी गस्त घालण्याचेही आदेश दिलेत.
नवरात्र उत्सवात दांडिया खेळण्याच्या ठिकाणी व आसपासच्या परिसरात पोलिसांनी योग्य तो बंदोबस्त तैनात करावा. विशेषतः आपापल्या हद्दीतील उद्याने, मोकळी मैदाने, सार्वजनिक गर्दीच्या ठिकाणांवरील गस्त वाढवावी. गर्दीच्या ठिकाणी मोकाट जनावरे फिरणार नाही याचीही दक्षता घ्यावी, अशी सूचना पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी केली आहे.

