कोल्हापूर-काँग्रेस नेते राहुल गांधी आज सकाळीच कोल्हापूरच्या दौऱ्यावर पोहोचले. तब्बल 14 वर्षांनंतर ते कोल्हापूरच्या दौऱ्यावर पोहोचलेत. या दौऱ्यात ते छत्रपती शाहू महाराज यांना आदरांजली वाहणार आहेत. तसेच संविधान सन्मान परिषदेलाही हजेरी लावणार आहेत. या दौऱ्यावर पोहोचल्यानंतर लगेचच राहुल यांनी कोल्हापुरातील काँग्रेस कार्यकर्ता असणाऱ्या एका टेम्पो चालकाच्या घरी पोहोचले. तिथे त्यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून त्यांची माहिती घेतली.
राहुल गांधी यांनी कोल्हापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. यावेळी त्यांनी आपला कालचा दौरा ऐनवेळी रद्द झाल्याबद्दल माफीही मागितली. ते म्हणाले, हा कार्यक्रम काल सायंकाळी होणार होता. पण विमानातील तांत्रिक बिघाडामुळे मला येथे येता आले नाही. त्यासाठी मी तुमची माफी मागतो.
राहुल यांचा हा दौरा विधानसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर होत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसाठी तो अत्यंत महत्त्वाचा आहे. दलितांना आरक्षण देणाऱ्या शाहू महाराजांची भूमी असलेल्या कोल्हापुरातून ते महाराष्ट्र निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत.
राहुल गांधी यांनी कोल्हापूर येथील उचगाव येथील टेम्पो चालक अजित संधे व त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.


