अखिल भारतीय काँग्रेस समिती अध्यक्ष अलका लांबा यांचे प्रतिपादन
३० व्या पुणे नवरात्र महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन
पुणे – ‘स्त्रीची प्रतिष्ठा आणि सन्मान तसेच सुरक्षा यांची ग्वाही मिळणे, हेच नवरात्र उत्सवातील शक्तीचे खरे जागरण ठरेल’, असे उद्गार अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अध्यक्ष अलका लांबा यांनी गुरुवारी येथे काढले. ‘आपापल्या घरातील, कुटुंबातील स्त्रियांचा सन्मान, प्रतिष्ठा राखण्याची शिकवण गरजेची आहे. पुरुष जेव्हा घरातील स्त्रीचा सन्मान करण्यास शिकतील, तेव्हा काळ आणि परिस्थिती बदलेल’, असेही त्या म्हणाल्या.
आबा बागुल आणि जयश्री बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार्या पुणे नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. पुणे नवरात्र महोत्सवाचे यंदा ३० वे वर्ष आहे. सकाळी ६ वाजून पाच मिनिटांनी शिवदर्शन येथील लक्ष्मीमाता मंदिरात आबा बागुल आणि जयश्री बागुल तसेच कुटुंबियांच्या उपस्थितीत घटस्थापना झाली. त्यानंतर गणेश कला क्रीडा मंच, येथे नवरात्र उत्सवाचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला.

उद्घाटन सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून काँग्रेसचे नेते व माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे,माजी आमदार मोहन जोशी, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड,तसेच ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, काॅग्रेस नेत्या संध्या सव्वालाखे, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार संजय जगताप, पुणे शहर काँग्रेस अध्यक्ष अरविंद शिंदे, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, पुणे शहर प्रशांत जगताप, शहर प्रमुख, शिवसेना उबाठा पक्ष संजय मोरे, अध्यक्ष, एनएसयूआय महाराष्ट्र प्र. काँग्रेस अमिर शेख, अध्यक्षा, पुणे शहर महिला काँग्रेस पूजा आनंद, माजी महापौर कमल व्यवहारे, संगीता तिवारी, संजय बालगुडे, अंकुश काकडे, दूरदर्शन व आकाशवाणीचे संचालक इंद्रजीत बागल आदी अनेक मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी पुणे नवरात्र महोत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना उद्घाटन सोहळ्यात ‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. राजीव खांडेकर (ज्येष्ठ संपादक), ॲड. वंदना चव्हाण (माजी खासदार, पर्यावरणवादी), नितीन बानगुडे-पाटील (प्रसिद्ध व्याख्याते), डॉ. संजीव चौधरी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ऑर्थोपेडिक सर्जन), आनंदी विकास (ज्येष्ठ संगीतकार व गायिका), हिंदवी पाटील (लावणी लोककलावंत) यांना उद्घाटन सोहळ्यात श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानपत्र, गौरवचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ आणि रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या सोहळ्यात गजराज ग्रुपच्या संदेश जगताप यांचाही गौरव करण्यात आला.
अलका लांबा यांनी राज्यात काही ठिकाणी घडलेल्या मुलींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनांचा उल्लेख केला. ‘नवरात्र उत्सवात देवीच्या शक्तीरूपांचे पूजन करत असताना, मुलींवर होणारे अत्याचार मनाला त्रास देतात. एकीकडे शक्तीरूपाचे पूजन आणि त्याच वेळी हे अत्याचार, हे चित्र संतापजनक आहे. आपण सार्यांनीच या प्रकारांचा गांभीर्याने विचार करायला हवा. आपल्या पुरुषांची मानसिकता बदलण्याची नितांत गरज आहे. विचार बदलले तरच कृती बदलेल, असे त्या म्हणाल्या’.
‘आबा बागुल यांनी आयोजिलेल्या या महोत्सवात सहभागी होताना, एका नगरसेवकामध्ये किती मोठी उर्जा असू शकते, याचे दर्शन घडले. आबांनी त्यांचा वार्ड किती उत्तम सांभाळला आहे आणि सामाजिक कार्याचा आदर्श उभा केला आहे, हे या महोत्सवाच्या निमित्ताने लक्षात येते’, असेही त्या म्हणाल्या.
‘उत्सवाच्या माध्यमातून गुणवंतांच्या पाठीवर कौतुकाची थाप ठेवणारे आणि सदैव माणसे जोडत राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे आबा बागुल’, अशा शब्दांत विश्वजीत कदम यांनी पुणे नवरात्र महोत्सवाचे प्रणेते, प्रवर्तक आबा बागुल यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. पुणे महानगरपालिकेतील सर्वांत अभ्यासू नगरसेवक अशी आबांची ओळख आहे आणि तरुणाईला लाजवेल असा त्यांचा उत्साह आणि उर्जा आहे, असेही कदम म्हणाले.
प्रास्ताविक मांडताना आबा बागुल यांनी नवरात्र महोत्सवातील उपक्रमांची माहिती दिली. ‘माणसाच्या हदर्यात बांधलेले घर कायम टिकते, हा आईचा उपदेश मी आचरत आहे. त्यातूनच महोत्सवाची ३० वर्षांची परंपरा निर्माण झाली आहे’, असे ते म्हणाले.
पुरस्कारप्राप्तांच्या वतीने राजीव खांडेकर तसेच वंदना चव्हाण व बालगुडे यांनी मनोगत मांडले.
सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे, फुलवंती चित्रपटातील नायिका प्राजक्ता माळी यांची उद्घाटन सोहळ्यातील उपस्थिती लक्ष्यवेधी होती. उद्घाटन सोहळ्याची सुरवात नृत्यांगना शर्वरी जमेनीस व त्यांच्या शिष्यांनी दुर्गानमन या रचनेने केली. स्वाती धोकटे व ग्रुपने देवीचा जागर व गोंधल सादर केला. बालिवूड धमाकामधून अनेक चित्रतारकांनी सादरीकऱण केले.
शिल्पा देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले तर घनश्याम सावंत यांनी आभार मानले. प्रारंभी देवीची आरती करण्यात आली. मान्यवरांनी दीपप्रज्ज्वलन केले.
उत्तरार्धात प्रसिद्ध गायक पं. श्रीनिवास जोशी व युवा गायक विराज जोशी यांची परंपरा ही गायन मैफल रंगली.

