पुणे:उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मराठी भाषकांचा स्वाभिमान वाढवणारा मोदी सरकारचा निर्णय असे वक्तव्य करत आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले,”एकीकडे महाराष्ट्रात मराठी ही मातृभाषा संकटात असल्याची चर्चा अनेक व्यासपीठांवरुन होत असताना,गेल्या कित्येक वर्षांची मराठी भाषकांची महत्त्वपूर्ण मागणी भारत सरकारने मान्य केली, मराठी भाषकांचा स्वाभिमान वाढवणारा हा मोदी सरकारचा निर्णय आहे, महाराष्ट्राचा उच्च शिक्षण मंत्री या नात्याने मी भारत सरकारचे अत्यंत मनापासून आभार मानतो, आनंद व्यक्त करतो.
भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करतानाही मातृभाषेला महत्त्वाचे स्थान दिले आहे,या पार्श्वभूमीवर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्याने देशभरातील ४५० विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार आहे. मराठी भाषा, बोलीभाषांचे संशोधन,लेखन, अनुवाद यासह मराठी भाषा ज्ञानभाषा व्हावी म्हणून या निर्णयामुळे मोलाची मदत होणार आहे.शिवाय राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये अधिक सशक्त करुन त्यांच्यामार्फत मराठी भाषा आणि
साहित्य, ग्रंथनिर्मिती, ग्रंथसंग्रह अशांसाठी प्रोत्साहन मिळणार आहे.
जगभरातील १५ कोटी मराठी भाषकांच्या वतीने या निर्णयाबद्दल मोदी सरकारचे पुन्हा आभार मानतो.
मराठी भाषकांचा स्वाभिमान वाढवणारा मोदी सरकारचा निर्णय :चंद्रकांतदादा पाटील
Date:

