श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग तर्फे आयोजित सार्वजनिक नवरात्रोत्सव
पुणे : माता माता की जय… श्री महालक्ष्मी माता की जय… च्या नामघोषात सारसबागेसमोरील श्री महालक्ष्मी मंदिरात पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सपत्नीक घटस्थापना केली. श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेने झाला. यानिमित्ताने मंदिराला आकर्षक सजावटीसह विद्युतरोषणाई देखील करण्यात आली आहे.
घटस्थापनेला ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, नारायण काबरा आदी उपस्थित होते. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रम देखील आयोजित करण्यात आले आहेत. घटस्थापनेचे पौरोहित्य मिलिंद राहुरकर यांनी केले.
अमिता अग्रवाल म्हणाल्या, दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत. संपूर्ण उत्सवात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांच्या हस्ते आरती व त्यांचा सन्मान सोहळा देखील आयोजित करण्यात आला आहे. धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्र उत्सव’ महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होणार आहे.
याशिवाय ढोल-ताशा वादनसेवा, पुणे मनपा महिला कर्मचारी सन्मान, नामांकित कंपन्यांमधील महिला एचआर यांचा सन्मान, महिला न्यायाधिशांचा सत्कार, लेखिका-कवयित्री सन्मान, पुणे मनपा स्वच्छता कर्मचारी सत्कार, कन्यापूजन, विविध शाळांतील शिक्षकांद्वारे भोंडला, वीरमाता-वीरपत्नी सन्मान, नारी तू नारायणी सन्मान सोहळा असे विविध कार्यक्रम होणार आहेत. तसेच सांस्कृतिक उपक्रमांमध्ये शिव-पार्वती विवाह सोहळा, कथकली नृत्य, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटय व पोवाडा सादरीकरण, सामुहिक गरबा आणि प्रतिकात्मक रावण दहन कार्यक्रम हे यंदाचे वैशिष्टय आहे. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.