फडणवीसांचे कठोर कारवाई करण्याचे निर्देश
पुणे- वानवडी येथील एका नराधमाने 6 वर्षांच्या दोन मुलींचा स्कुल व्हॅनमध्ये लैंगिक छळ केला आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सदर स्कूल व्हॅनची तोडफोड करण्यात आली. याच व्हॅनमध्ये चिमुकलींवर अत्याचार झाल्याचा दावा या कार्यकर्त्यांनी केला आहे. पोलिसांनी वंचितच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
दुसरीकडे, या घटनेनंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच संस्थाचालकांना स्कूलबस चालक व वाहकांची पार्श्वभूमी तपासण्याचे निर्देश दिलेत. तसेच या घटनेतील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची ग्वाहीही दिली आहे.तर आज सकाळी पत्रकारांनी पुण्यात अशा प्रकारचा मुलीच्या बाबत गुन्हा घडल्याची माहिती दिल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना हा प्रकार समजला आणि त्यांनी याबाबत तुमच्याकडूनच हे समजलेय असे सांगत आपण माहिती घेतो असे म्हटले होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पुण्यात स्कूल व्हॅनमध्ये एका चालकाने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केला आहे. त्याने आणखी एका मुलीवरही अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचे समोर आले आहे. अतिशय वाईट पद्धतीने हे शोषण झाले आहे. चालक फरार होता, त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून त्याच्यावर कठोर कलमे लावली आहेत. आरोपीवर पोलिसांकडून निश्चितपणे कडक कारवाई करण्यात येईल. त्याला कठोरातील कठोर शिक्षा दिली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, याप्रकरणी शाळेच्या संस्थाचालकांना बोलावण्यात आले आहे. यात त्यांचा काही दोष आहे का? याचा तपास केला जात आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या ट्रान्सपोर्टेशनची जी काही पद्धत आहे. त्यामध्ये वाहन-चालक म्हणून काम करणारे योग्य आहेत की नाही, तसेच स्कूलबस चालकांची पार्श्वभूमी याची तपासणी केली पाहिजे, असे इतर सर्व शैक्षणिक संस्थांना सांगितले आहे, असेही फडणवीस म्हणाले.
नेमके प्रकरण काय?
पुण्यातील वानवडी येथे एका 45 वर्षीय स्कुल व्हॅन चालकाने सहा वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका मुलीच्या पालकांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर इतर मुलींची चौकशी केल्यानंतर आरोपीने आणखी एका मुलीचे शोषण केल्याचे समोर आले. याप्रकरणी आरोपी संजय रेड्डी याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही मुली एका नामांकित शाळेतील आहेत. त्यामुळे या प्रकारानंतर पुण्यात एकच खळबळ उडाली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींनाही कठोर शासन करण्याचे संकेत दिले. प्रस्तुत प्रकरणातील आरोपींना काही स्थानिक राजकीय नेत्यांनी पळून जाण्यात मदत केल्याचा आरोप आहे. मी अशा प्रकारच्या घटनांमध्ये राजकीय पक्ष वगैरे काहीही पाहत नाही. आरोपी हा आरोपीच असतो. अशा आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच आरोपीला मदत करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे ते म्हणाले.

