सांगली-शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडेयांनी आता गणपती आणि नवरात्र उत्सवाबाबत बोलताना एक वादग्रस्त विधान केले आहे. नवरात्रातील दांडिया हिंदू समाजाला xx बनवत आहे. गणपती उत्सवाचा चोथा झाला आहे, असे संभाजी भिडे म्हणाले. सांगली येथे आयोजित दुर्गामाता दौड वेळी ते बोलत होते.
संभाजी भिडे म्हणाले की, गणपती आणि नवरात्र उत्सव आता इव्हेंट झाले आहेत. असे इव्हेंट हिंदू समाजाला गांxx बनवत आहेत. नवरात्र उत्सवात करमणुकीचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत, जे उत्सवाची शुद्धता आणि परंपरा नाश करत आहेत. नवरात्रीचा बट्ट्याबोळ आम्ही होऊ देणार नाही, असे भिडे यांनी सांगितले. तसेच काही माता-भगिनींनी स्वतंत्र दुर्गामाता दौड काढावी, असे आवाहन देखील भिडे यांनी केले.
… असा पंतप्रधान मिळाला आपले दुर्दैव
संभाजी भिडे यांनी यावेळी आपल्या भाषणात हिंदू समाजावर गंभीर टीका केली आहे. शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाला जगाचा बाप बनण्याचा मार्ग शिकवला, पण आज गणपती आणि नवरात्र उत्सवात आम्ही समाजाला गोंधळात टाकत आहोत, असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी माजी पंतप्रधान पंडीत नेहरू यांच्यावरही निशाणा साधला. हिंदी चिनी भाई भाई म्हणणारा पंतप्रधान आपल्या देशाला दुर्दैवाने मिळाला, अशी टीका संभाजी भिडे यांनी केली आहे. हिंदू मुस्लिम भाई भाई, हिंदूंना शत्रू कोण, वैरी, वाईट कोण, चांगलं कोण हे हिंदू समाजाला कळत नाही. आतापर्यंत 76 राष्ट्रांनी आपल्यावर आक्रमणे केली. अजूनही ते आपला पाठलाग करत आहेत. असंख्य आक्रमणे झालेला बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान, असे विधान संभाजी भिडे यांनी केले.
संभाजी भिडे यांनी यावेळी सध्या सुरू असलेल्या राजकारणही भाष्य करत टीका केली आहे. आज सगळे सामाजिक कार्यक्रम करमणूक, मिरवणूक आणि निवडणूक यासाठी राबवले जातात. राजकारण, अर्थकारण, शुद्र हे सर्व थुंकण्याच्या लायकीचे विषय आहेत. महामुर्ख जमात म्हणले हिंदू जात आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा भारत करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे संभाजी भिडे म्हणाले.
दरम्यान, संभाजी भिडे यांनी याआधीही अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. काही महिन्यांपूर्वी त्यांनी महिलांच्या कपड्यांबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. वटसावित्रीच्या पूजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावे, असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केले होते.
दुर्गा माता दौडीसंदर्भात भिडेंच्या संघटनेकडून दिली जाणारी माहिती ….
दुर्गा माता दौडीचा अर्थ काय ? ती का आयोजित केली जाते ? आपण त्यात का सामील व्हावे?गेल्या कित्येक वर्षांपासून आदरणीय संभाजीराव भिडे गुरुजी, त्यांचे संघटन श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, संघटित हिंदू समाजासाठी सतत कार्यरत आहे. लाखो धारकरी देशाच्या आणि धर्माच्या कार्यात आपले मोलाचे योगदान देत आहेत.दरवर्षी शारदीय नवरात्रात गावागावात आणि शहरातही पूर्ण शिस्तबद्ध स्वरूपात दुर्गा माता दौडीत धारकरी सहभाग घेतात. ही परंपरा गेली अनेक वर्षे सातत्याने चालू आहे. दुर्गा माता दौड म्हणजे सर्व शिवभक्त एकत्रितपणे शिस्तबद्ध पद्धतीने चालणे किंवा धावणे. दुर्गामाता, कालीमाता, चंडीमाता, भारतमाता, गोमाता, हे सर्व एकच आहेत आणि हिंदू तरुण या मातांच्या चरणी धावत जाऊन देव, देश आणि धर्म यांच्या प्रति शपथ घेतात.हिंदूंवर येणाऱ्या कोणत्याही आपत्तीत हिंदू ऐक्य आणि संघटनचे प्रतिक म्हणून ही दौड एकत्र येऊन त्या संकटास तोंड देण्यासाठी आहे. ज्याप्रमाणे सैन्याचे संचलन त्यांच्या ऐक्याच्या अनुशासनाचे प्रतिक आहे, तशाच प्रकारे सर्व हिंदू समाज सर्व प्रकारचे मतभेद, फरक आणि विविधता विसरून संघटितपणे एकत्र काम करण्यासाठीचे प्रतिक म्हणजे ही *श्रीदुर्गामाता दौड* आहे. म्हणूनच, सर्व देव, देश – धर्मप्रेमी हिंदूंना विनंती आहे की त्यांनी या दुर्गामाता दौडीत सहभाग घ्यावा आणि या धर्म आणि देशाच्या कार्यात योगदान द्यावे ! दुर्गामाता भारतमाता एक है, एक है कालीमाता भारतमाता एक है, एक है गंगामाता भारतमाता एक है, एक है गो माता भारतमाता एक है, एक है जिजामाता भारतमाता एक है, एक है |