माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो-गोवा ने 2 ऑक्टोबर 2024 रोजी स्वच्छ भारत दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला . आज पेडणे(पेरनेम) येथील व्हिस्काउंट ऑफ पेरनेम हायस्कूल, येथे सुमारे 700 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन महात्मा गांधींची भव्य प्रतिमा साकार केली.
‘संपूर्ण सरकार’ दृष्टीकोना अंतर्गत, स्वच्छता ‘प्रत्येकाची सवय’ बनवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू केलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त व्हिस्काउंट शाळेच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी कला शिक्षक राजमोहन शेट्ये यांच्याकडे पाच दिवस प्रशिक्षण घेतले होते. महात्मा गांधींची भव्य प्रतिमा साकारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे ड्रोन कॅमेऱ्याने चित्रीकरण करण्यात आले.
त्यानंतर, शाळेतील एका कार्यक्रमात बोलताना, शिक्षणतज्ज्ञ रुपा देशप्रभू म्हणाल्या की, प्रत्येक व्यक्तीने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी स्वीकारणे आणि अशा प्रकारे स्वच्छ भारत मोहिमेला एक व्यापक चळवळ बनवणे महत्त्वाचे आहे. एक उत्कृष्ट राजकारणी आणि भारताचे तिसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचीही आज जयंती असून त्यांच्या योगदानाचे स्मरण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
उपस्थितांना संबोधित करताना, रियास बाबू, क्षेत्रीय प्रचार अधिकारी, सीबीसी गोवा , म्हणाले की स्वच्छ भारत अभियान केवळ परिसर स्वच्छ करण्यापुरते मर्यादित नाही. “नेचर मासिकाने या अभियानाच्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे, त्यांनी अंदाज वर्तवला आहे की यामुळे दरवर्षी 60,000-70,000 बालमृत्यू टाळण्यात मदत झाली आहे . त्याचप्रमाणे, जागतिक आरोग्य संघटनेच्या 2018 च्या अहवालात अंदाज वर्तवला आहे की या अभियानामुळे 2014 च्या तुलनेत 2019 मध्ये अतिसारामुळे होणारे 3 लाखांहून अधिक मृत्यू रोखले गेले. त्यामुळे, हे अभियान जीव वाचवणे, आरोग्यदायी वातावरण आणि वंचितांना सन्मान प्रदान करणे याबद्दल आहे. ,” असे ते म्हणाले.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी स्वच्छता संकल्पनेवर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथही घेतली. व्हिस्काउंट शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र बोंद्रे, इतर शिक्षक कर्मचारी, पालक, विद्यार्थी आणि सीबीसीचे अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येत असलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाचा एक भाग म्हणून, सीबीसी ने स्वच्छता मोहीम आणि विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. एक पेड माँ के नाम कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण मोहीमही राबवण्यात आली. जनतेमध्ये स्वच्छतेप्रति जागरूकता निर्माण करण्याच्या उपक्रमांचा भाग म्हणून सीबीसी ने पणजीत आणि आसपासच्या परिसरात स्वच्छता अभियानसंबंधी फलक देखील लावले आहेत.

