क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूट ला समर्थ गौरव पुरस्कार प्रदानसमर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढोल तलवार पथकाचा २५ वा वर्धापन दिन सोहळा
पुणे : सीमेवर भारतीय सैन्य उभे राहते कारण देशप्रेमी लोक त्यांच्या पाठीशी उभे राहतात. देशातील लोक कायमच सैनिकांप्रती कृतज्ञ भावना ठेवतात. हेच सैनिक देशासाठी लढताना अपंगत्व आले तरी जिद्द सोडत नाहीत. आत्मविश्वासाने ते आलेल्या परिस्थितीला सामोरे जातात. दोन्ही हात-पाय नसले तरी मनाने ताकदवान राहिले पाहिजे हे त्यांच्याकडून शिकायला मिळते, असे मत निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले.
समर्थ प्रतिष्ठान ढोल ताशा ध्वज व ढाल तलवार पथक हे २५ वा वर्धापन दिन सोहळा साजरा करीत आहेत. त्यानिमित्त समर्थ गौरव पुरस्कार प्रदान सोहळ्याचे आयोजन बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते. यंदाचा समर्थ गौरव पुरस्कार क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटला भूषण गोखले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी इन्स्टिट्यूटचे डीन कर्नल वसंत बल्लेवार (निवृत्त) आणि कर्नल चंद्रशेखर चितळे (निवृत्त) यांनी पुरस्कार स्विकारला.
कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष उद्योजक पुनीत बालन, किरण साळी, हनुमंत बहिरट, अॅड. प्रताप परदेशी, , डॉ. अ.ल.देशमुख, प्रसाद कुलकर्णी, प्रशांत टिकार, विकास पवार, भूषण पंड्या, पराग ठाकूर, संकेत मते, शाहीर दादा पासलकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सातपुते,उपाध्यक्ष अथर्व कुलकर्णी, सचिव योगेश यादव,खजिनदार निरंजन माळवदकर, सदस्य जय सूर्यवंशी, संदेश खरात, नितीन डिंबर हे उपस्थित होते.
रुपये २५ हजार, सन्मान चिन्ह, शाल, पुणेरी पगडी असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी समर्थ प्रतिष्ठानच्या स्मरणिकेचे प्रकाशन देखील झाले. हिरामण बनकर विद्यालय, पुणे विद्यार्थी गृह यांना क्रीडा साहित्य खरेदी साठी प्रत्येकी २५ हजार आणि वृद्धश्वर सिद्धेश्र्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी एक लाख पंचवीस हजार रुपये देण्यात आले. २५ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व यावेळी घेण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या संपूर्ण शिक्षणाचा खर्च इंद्राणी बालन फाऊंडेशन आणि समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येणार आहे.
वसंत बल्लेवार म्हणाले, भारताची सेना विश्वातील एक नंबर आहे. देशातील नागरिक सैनिकांप्रती ज्या भावना व्यक्त करतात आणि सहकार्य करतात त्यामुळे सैनिकांना स्फूर्ती मिळते. सिमेवर जेव्हा सैनिक उभा असतो, तेव्हा तो फक्त देशाचा विचार करत असतो. देशातील लोक हे सैनिकांची ताकद आहेत. समर्थ प्रतिष्ठानने केलेला हा सन्मान देशातील प्रत्येक सैनिकांपर्यंत पोहोचेल. त्यांचे मनोबल वाढविणारा हा सन्मान आहे.
कर्नल चितळे म्हणाले, देशासाठी कर्तव्य बजावत असताना अपंगत्व आलेल्या सैनिकांना पुन्हा आत्मविश्वासाने स्वबळावर उभे करण्याचे काम क्वीन मेरी टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये केले जाते. हे काम १०६ वर्षांपासून सुरु आहे. काळानुसार या संस्थेत बदल होत गेले. अनेक अपंग सैनिक या माध्यमातून उद्योजक झाले आहेत.
संजय सातपुते म्हणाले, वादनासोबतच सामाजिक बांधिलकी देखील प्रतिष्ठानच्या माध्यमातून जपली जाते. आजपर्यंत एकूण १ कोटी २५ लाखांपेक्षा अधिक रक्कम शैक्षणिक व सामाजिक कायार्साठी देणगी देऊन सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानने केला आहे. पराग ठाकूर यांनी मनोगत व्यक्त केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. अथर्व कुलकर्णी यांनी आभार मानले.

