पुणे :महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’ निमित्त पुण्यात २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेआठ वाजता गांधी जयंती आणि जागतिक अहिंसा दिनाच्या निमित्ताने ‘दंगलमुक्त पुणे’ हा संदेश घेऊन ‘शांती मार्च’ काढण्यात आला.गोखले चौक (कलाकार कट्टा) ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (डेक्कन) ते कर्वे पुतळा (कोथरूड) ते महात्मा गांधी पुतळा (गांधी भवन) या मार्गावर हा शांती मार्च काढण्यात आला.या शांती मार्चला चांगला प्रतिसाद मिळाला.समाजात शांतता नांदावी असा आग्रह धरणाऱ्या नागरिकांची संख्या अधिक असेल तरच समाजात शांतता नांदते,असा शांती मार्च आयोजनामागचा उद्देश होता.
‘महात्मा गांधी अमर रहे’,’दंगल आहे अमंगल’,’जिंकायचे असेल तर प्रेमाने जिंका’,’बलवान माणूसच क्षमा करू शकतो’,’गांधी विचार -राष्ट्रीय एकात्मतेचा आधार’,’जात -पात बंधन तोडो’,’महात्मा गांधी म्हणजे प्रेम,सद्भाव आणि एकोपा’असे फलक शांती मार्च मध्ये तरुणाईने हाती घेतले होते.
डॉ.प्रवीण सप्तर्षी,प्रा.सौ.रमा सप्तर्षी,जांबुवंत मनोहर,एड.स्वप्नील तोंडे,तेजस भालेराव,रोहन गायकवाड,माजी नगरसेवक निलेश निकम,सचिन पांडुळे,नागेश भोसले,उमेश चव्हाण,मिलिंद गायकवाड,विवेक काशीकर,उमेश कंधारे,चंद्रकांत जाधव यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी,महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी झाले.प्रारंभी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.शांतताविषयक विविध संदेश आणि फलक घेऊन तरुणाई या मार्चमध्ये सहभागी झाली. शांती मार्च मध्ये भारती विद्यापीठ, एमसीई सोसाइटी (आझम कॅम्पस ), पूना कॉलेज, मराठवाडा मित्रमंडळ महाविद्यालय,ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेस,माहेर संस्था,रूग्ण हक्क परिषद, जमाते इस्लामी हिंद यांचे प्रतिनिधी सहभागी झाले. गांधी भवन येथे समारोप प्रसंगी या सर्वांना डॉ.कुमार सप्तर्षी यांनी मार्गदर्शन केले.दादा पाटील,अन्वर राजन,एम.एस.जाधव यावेळी उपस्थित होते.
तत्पूर्वी,गांधीभवन येथे सकाळी आठ वाजता शुभांगी मुळे आणि सहकाऱ्यांचा प्रार्थना आणि भजनाचा कार्यक्रम झाला.गांधी जयंती निमित्त स.११ ते दु. ३ दरम्यान सर्वांकरीता प्रसाद भोजन आयोजित करण्यात आले.
सप्ताहातील आगामी कार्यक्रम
दि.३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘नागरी समाज व निवडणुका ‘ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे (दिल्ली)यांचे व्याख्यान होणार आहे.दि.४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता एलोरा बोरा यांचे भरतनाट्यम नृत्य आयोजित करण्यात आले आहे.दि.५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता जेएनयू मधील ज्येष्ठ प्राध्यापक डॉ.मणिंद्रनाथ ठाकूर यांचे २१ वी सदी की समस्याए और गांधी ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे.
दि.६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता संजय रघुवीर यांचे जादूचे प्रयोग होणार आहेत.सायंकाळी ६ वाजता ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे ‘भारतीय लोकशाही समोरील आव्हाने ‘ या विषयावर व्याख्यान होणार आहे. दि.७ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता ‘संसदीय आणि बिगर संसदीय राजकारण’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे,अभ्यासक चैत्रा रेडकर,पत्रकार रवींद्र पोखरकर सहभागी होणार आहेत. डॉ.कुमार सप्तर्षी हे अध्यक्षस्थानी असतील.
खादी प्रदर्शन,गांधी चित्रपट महोत्सव
गांधी सप्ताहानिमित्त ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताह फिल्म फेस्टीव्हल’ आयोजित करण्यात आला आहे.गांधी भवन मध्येच विविध चित्रपट दाखवले जातील.दि.२ ऑकटोबर रोजी दुपारी १ वाजता ऑस्कर विजेता ‘गांधी’ हा चित्रपट दाखवला गेला .दि.३ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम’,दि.४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘टू मच डेमोक्रसी’,दि.५ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘कोर्ट’,दि.६ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘द किड’,दि.७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता ‘जय भीम कॉम्रेड’ हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.
महात्मा गांधी यांच्या जीवनावरील छायाचित्र प्रदर्शन मुख्य सभागृहात सप्ताहभर खुले असेल. गांधी भवन आवारात खादी प्रदर्शन,पुस्तक प्रदर्शन,इतर गृहोपयोगी वस्तूंचे स्टॉल मांडण्यात येणार आहेत.

