भाजपाने लढण्याआधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मविआचेच सरकार येणार: नाना पटोले
गांधी जयंतीनिमित्त मणिभवनला भेट देऊन काँग्रेस नेत्यांचे गांधींजींना अभिवादन.
मुंबई, दि. २ ऑक्टोबर २०२४
धर्माच्या नावावर राजकारण करणाऱ्या लोकांनी गांधी विचार व गांधीजींनी घालून दिलेल्या अहिंसेच्या मार्गाचा अवलंब करावा. सर्वांनी आपापसात न भांडता भाईचारा जपावा. इराण व इस्राईलमध्ये आज जे सुरु आहे त्याची जगभर चर्चा होत आहे. अशावेळी गाधींजींनी घालून दिलेला आदर्श व अहिंसेचा मार्गच महत्वाचा ठरतो, जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी गांधींजींनी घालून दिलेल्या मागार्चा अवलंब करावा, असे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने काँग्रेसच्या नेत्यांनी मणिभवनला भेट देऊन महात्मा गांधीजींना अभिवादन केले. तसेच चरक्यावर सुत कातले व भजन गायनही करण्यात आले. यावेळी प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, आमदार भाई जगताप, आ. अमिन पटेल माजी मंत्री सुरेश शेट्टी, प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे, चरणजित सप्रा, प्रदेश सरचिटणीस ब्रिज दत्त, आदी उपस्थित होते.
यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना रमेश चेन्नीथला पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी महात्मा गांधी यांचे नाव सातत्याने घेत असतात पण ते गांधीजींचा आदर्श तसेच गांधीजींनी घालून दिलेला अहिंसेच्या मार्गाचे पालन करताना दिसत नाहीत. जातीच्या धर्माच्या नावावर लोकांमध्ये फुट पाडण्याचे काम ते करत आहेत, हे देशाच्या हिताचे नाही. देशाच्या विकास व प्रगतीसाठी गांधी विचारच महत्वाचा आहे त्याचा अवलंब त्यांनी करावा, असा सल्ला त्यांनी दिला. तसेच केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याआधीच महाराष्ट्रात पराभव मान्य केला आहे. भाजपाची निती ही वापरा आणि फेकून द्या अशी आहे तेच महाराष्ट्रातही भाजपा मित्रपक्षांसोबत करत आहे असेही चेन्नीथला म्हणाले. भाजपा सरकारचे शेवटचे दिवस उरले असल्याने सरकार धडाधड निर्णय घेत आहे पण सरकारकडे पैसा नाही व निवडणूक होणार असल्याने त्याची अमंलबजावणी होणे कठीण आहे. मते मिळवण्यासाठी भाजपा सरकारची शेवटची धडपड सुरु आहे पण महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे त्यांना सर्व समजते असेही चेन्नीथला म्हणाले.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून कसलेही मतभेद नाहीत. आघाडीच्या राजकारणात प्रत्येक पक्ष आपल्याला जागा मिळावी याचा विचार करत असतो. पण महायुतीमध्ये जागा वाटपावरून महाभारत सुरु आहे ते पहा, त्यांचा मुख्यमंत्री कोण होणार हे त्यांना विचारा. भाजपा सरकारने १० वर्षात महाराष्ट्राला लुटण्याचे काम केले आहे. भ्रष्टाचारात भाजपा सरकारने विक्रम केला आहे, कर्मचाऱ्यांचे पगार होत नाहीत, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाहीत, महागाई प्रचंड वाढली आहे, अशी अवस्था असून या महाराष्ट्रद्रोही, शिवद्रोही सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याचा मानस जनतेने केला आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे सरकार येईल असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.