पुणे ः पुणेकर रसिकांनी ‘श्रीराम कथा संगीतिका’ या आगळ्यावेगळ्या नाट्यप्रयोगाचा नुकताच अनुभव घेतला. रसिकांची त्याला उत्स्फूर्त दाद मिळाल्याने हा प्रयोग उत्तरोत्तर रंगतच गेला. नगरची अग्रगण्य संस्था श्रुती संगीत निकेतनतर्फे येथील टिळक स्मारक मंदिरात या खुल्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते.
संगीतिका हा नाटक आणि संगीत या दोन कलांचा एकात्म आविष्कार साधणारा नाट्यप्रकार आहे. संगीतात रचनाबद्ध केलेली व गायक नटांनी सादर केलेली पद्यात्म नाट्यकृती म्हणजे संगीतिका. यात गीतांबरोबरच पात्रांचे संवादही गायनातूनच सादर केले गेले. या संगीतिकेचे लेखन डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांनी केले असून, तिचे दिग्दर्शन डॉ. धनश्री खरवंडीकर यांनी केले आहे. मकरंद खरवंडीकर यांनी तिला संगीत दिले असून, कल्याणी कामतकर यांनी नृत्य दिग्दर्शन केले होते. अनुजा कुलकर्णी आणि कुमूदिनी बोपर्डीकर यांचे विशेष सहाय्य लाभले. आहे. यात मुख्यतः ५० शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी भूमिका केल्या. हे सर्व विद्यार्थी नगर येथे श्रुती संगीत निकेतन मध्ये संगीत व नाट्य प्रशिक्षण घेत आहेत.
संगीतिकेच्या प्रथम भागात श्रीरामांच्या राज्याभिषेक प्रसंगापासून सीता अपहरणापर्यंत आणि दुसऱ्या भागात रावणवधापासून सीता भूमीत जाऊन आपला अवतार संपवते इथपर्यंतच्या कथानकाचा समावेश होता. प्रासादिक गीते, काव्यमय संवाद असे या संगीतिकेचे लक्षवेधी स्वरूप होते. अनेक प्रसंगांना रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभली. श्रीरामांच्या जयजयकाराने सभागृह दुमदुमले. पं. विकास कशाळकर, पं. यादवराज फड, मधुवंती दांडेकर, वर्षा जोगळेकर, मानसी खांडेकर, रवींद्र कुलकर्णी, माधुरी डोंगरे, साधना घुगरी, चिन्मय जोगळेकर, अस्मिता चिंचाळकर आदी संगीत आणि नाट्यक्षेत्रातील मान्यवरांनी या प्रयोगाला दाद दिली.