जळगाव दिनांक ३० सप्टेंबर
पुण्याच्या समृद्धी कुलकर्णी हिने रिशा मिरचंदानी (टीएसटी मुंबई) हिचा सरळ तीन गेम्समध्ये पराभव केला आणि आमदार चषक चौथ्या राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील महिलांच्या गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली. तिच्याबरोबरच संपदा भिवंडीकर, श्रेया देशपांडे, आर्या सोनगडकर, काव्या भट्ट यांनीही विजयी घोडदौड कायम राखली.
जळगाव जिल्हा टेबल टेनिस संघटनेतर्फे आणि महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस संघटनेच्या मान्यतेने ही स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुल एम.जे. कॉलेज येथे सोमवारपासून सुरू झाली.
सहाव्या मानांकित समृद्धी हिने रिशा मिरचंदानीविरुद्ध १२-१०,११-६,११-९ असा विजय मिळवताना टॉप स्पिन फटक्यांचा बहारदार खेळ केला. तृतीय मानांकित संपदा भिवंडीकर (टीएसटी मुंबई) हिने रायगडच्या अनिशा पात्रा हिचे आव्हान ५-११,११-५,११-२,१२-१० असे संपुष्टात आणले. ठाण्याच्या श्रेया देशपांडे या सातव्या मानांकित खेळाडूने श्वेता पार्टे- नायक (मुंबई महानगर जिल्हा) हिला अटीतटीच्या लढतीनंतर पराभूत केले. हा सामना दोन्ही खेळाडूंनी केलेल्या अष्टपैलू खेळामुळे रंगतदार झाला. अखेर देशपांडे हिने हा सामना ११-७,७-११,१०-१२, १२-१०, ११-० असा जिंकला. ठाण्याची आर्या सोनगडकर या द्वितीय मानांकित खेळाडूने नाशिकच्या मिताली पूरकर हिच्यावर ११-७,११-२,११-७ असा एकतर्फी विजय मिळविला. हा सामना जिंकताना तिने काउंटर अटॅक पद्धतीचा सुरेख खेळ केला.
तेरावी मानांकित खेळाडू काव्या भट्ट (ठाणे) हिने मुंबई महानगर जिल्हा संघाची खेळाडू सेनहोरा डिसूझा हिच्यावर सनसनाटी विजय मिळविला. हा सामना तिने ५-११,८-११,११-९,११-९,१३-११ असा संघर्षपूर्ण लढतीनंतर जिंकला आणि उपांत्यपूर्व फेरी गाठली.