: शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे युवा कलागौरव पुरस्कार प्रदान
पुणे : शाहिरीसह अनेक लोककला या महाराष्ट्राच्या संस्कृतीच नव्हे तर देश विदेशामध्ये महाराष्ट्राची ओळख आहे. ही ओळख टिकवण्यासाठी अनेक लोककलावंत जीवाचे रान करून कष्ट करत आहे. परंतु या लोककलावंतांना सराव करण्यासाठी तसेच कार्यक्रम सादर करण्यासाठी हक्काची जागा मिळत नाही. अशा लोककलावंतांच्या सोयीसाठी महापालिकेने हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी शाहीर हेमंतराजे मावळे यांनी केली.
शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे देण्यात येणारा शाहीर हिंगे युवा कलागौरव पुरस्कार युवा संगीतकार हर्ष विजय यांना शाहीर हेमंतराजे मावळे यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. पुणे महापालिकेचे उपायुक्त माधवराव जगताप, संस्कार भारतीचे पश्चिम प्रांत प्रतिनिधी दिलीप क्षीरसागर यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. युवा संगीतकार हर्ष विजय यांची पुरस्कार वितरण समारंभानंतर होनराज मावळे यांनी मुलाखत घेतली. बालरंगभूमी आयोजित लोककला स्पर्धेतील प्रबोधिनीतील विजेत्यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.
शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, पुणे महापालिकेतर्फे लोककलावंतांना विविध पुरस्कार देण्यात येतात, परंतु काही तांत्रिक कारणास्तव या पुरस्काराच्या रोख रक्कम लोक कलावंतांना मिळत नाही या रोख रकमा जर लोक कलावंतांना मिळाल्या तर त्यांना निश्चितच लोककला जतनासाठी ते जे प्रयत्न करत आहेत त्यासाठी उपयोग होऊ शकेल.
माधवराव जगताप म्हणाले, लोककला जिवंत ठेवण्यासाठी पुणे महापालिका सर्वतोपरी प्रयत्न करेल. लोककलावंतांना महापालिकेच्या नाट्यगृह किंवा कलादालन यापैकी एक जागा विनामूल्य सादरीकरणासाठी मिळावी यासाठी महापालिका आयुक्तांकडे चर्चा करण्यात येईल. तसेच महापालिका पठ्ठे बापूराव पुरस्कार इतर खाजगी संस्थांच्या माध्यमातून पुन्हा सुरू करण्यात येईल.
दिलीप क्षीरसागर म्हणाले, लोककलावंतांची पिढी जर घडली तरच खऱ्या अर्थाने लोककला जिवंत ठेवण्यासाठी सुरू असणाऱ्या प्रयत्नांना यश मिळाले असे म्हणावे लागेल. ही लोककलावंतांची पिढी घडविण्याचे काम शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी करत आहे. पाश्चात्य संस्कृतीच्या माऱ्यामुळे सैरभैर झालेल्या तरुणांपर्यंत महाराष्ट्राची खरी ओळख म्हणजेच लोककला पोहोचण्यासाठी व्यापक प्रमाणावर प्रयत्न करणे गरजेचे आहे.