माझ्या मुलाने डाका घातला नाही किंवा कोणतीही चोरी किंवा लबाडी केली नाही. पहिला क्रमांक येऊनही त्याची पोलिस भरतीत निवड झाली नाही. एवढे दिवस रोजगार मिळाला नसल्यामुळे तो काय करणार? त्यातूनच त्याने हे कृत्य केले असावे. आता वाचला तर गावाकडे येईल अन्यथा तिकडेच मरेल, अशा शब्दांत संसदेबाहेर धुराच्या नळकांड्या फोडणाऱ्या अमोल शिंदेच्या आई-वडिलांनी आपल्या लेकाची व्यथा मांडली आहे.
संसदेबाहेर पिवळ्या धुराच्या नळकांड्या फोडल्याप्रकरणी पोलिसांनी लातूरच्या अमोल शिंदे नामक तरुणाला अटक केली आहे. या घटनेमुळे अवघ्या देशात हल्लकल्लोळ माजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी गुरुवारी अमोल शिंदेच्या आई वडिलांचा एक व्हिडिओ ट्विट केला. त्याद्वारे त्यांनी अमोल शिंदे व त्याच्या आई-वडीलांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
खाली वाचा जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट
जितेंद्र आव्हाड आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की, देशाच्या संसदेत जो प्रकार घडला त्याचा मी जाहीर निषेध करतो. त्या कृतीचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येणार नाही आणि मी स्वत: ते करत नाही, हे सर्वप्रथम इथे नमूद करू इच्छितो. त्यासोबतच ज्या तरूणाने हे कृत्य केलं तो अमोल शिंदे, महाराष्ट्राच्या लातूर जिल्ह्यातील असल्याने या प्रकरणाची दुसरी बाजूही जाणून घ्यायला हवी.
मी इथे शेअर केलेला व्हिडिओ अमोलच्या आई-वडिलांचा आहे. आपला मुलगा शिकलेला आहे आणि अनेक वर्ष नोकरीसाठी धडपडतोय, असं ते सांगतायत. खेळात चांगली कामगिरी करूनही पोलिसात भरती होता आलं नाही आणि काही लोकं लाखभर रूपये भरून भरती होतायत. राज्यातील बेरोजगारी आणि भ्रष्टाचाराच्या वास्तवाकडे दुर्लक्ष कसं करणार?
आज अमोलने जो गुन्हा केलाय,त्यासाठी व्यवस्था त्याला शिक्षा देईल.मात्र,ज्या व्यवस्थेने त्याला हे करायला भाग पाडलं त्याला कोण आणि कशी शिक्षा करणार?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या ट्विटमध्ये उपस्थित केला आहे.

