पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत पार पाडण्यासाठीचे प्रयत्न फसले–अखेर २८ तासांनीच संपली पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक-
यापूर्वी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळी दगडूशेठचे विसर्जन होत असत, दगडूशेठ गणपती जात नाही तोवर गर्दी राहते आणि पोलिसांवर तणाव राहतो,या काळात संपूर्ण शहर आणि परिसर वेठीस धरला जातो असा आरोप होत असत या पार्श्वभूमीवर गणपतीपुढील अनेक पथकांच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आल्या.. मिरवणुकीची लवकर सांगता व्हावी यासाठी गेल्या वर्षापासून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मिरवणुकीत लवकर सहभागी होत आहे , यंदा तर दगडूशेठ चार वाजता मिरवणुकीत सहभागी होऊन रात्री सव्वा आठ वाजता या गणपतीचे विसर्जन झाले, ऐतिहासिक निर्णय घेतलेल्या दगडूशेठ मंडळाचे गेल्यावर्षी कौतुक झाले आणि याही वर्षी होईल पण ….तरीही मिरवणुकीचा कालावधी कमी मात्र झाला नाही … तरीही होतो तेवढाच कालावधी मात्र वाढू न देता कायम राखण्यात यश मिळाले आहे
पुणे- शहरातील गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीला महात्मा फुले मंडई येथील पुतळ्यापासून काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मानाचा पहिला कसबा गणपतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून आणि ढोल-ताशांच्या गजरात सुरुवात झाली. त्यानंतर आज दुपारी ३ वाजता भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळांच्या मिरवणुकीने सांगता झाली. ही विसर्जन मिरवणूक तब्बल 28 तास 45 मिनिटे चालली, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी पोलिस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त संदीपसिंह गिल हे उपस्थित होते. यावेळी अमितेशकुमार म्हणाले की, गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीकरिता जवळपास आठ हजार अधिकारी, कर्मचारी बंदोबस्तावर होते, त्यामुळे शहरात मोठ्या उत्साहात मिरवणूक पार पडली. या सर्व घडामोडीदरम्यान सर्व अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने योग्य नियोजन केल्याने दुपारी ३ वाजेपर्यंत ही मिरवणूक चालली. या मिरवणुकीत दरवर्षीप्रमाणे यंदादेखील अखेरचा मंडळ भवानी पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळ हे गणपती विसर्जनासाठीचे शेवटचे मंडळ ठरले असून ही मिरवणूक २८ तास चालल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यातील ऐतिहासिक गणेशाेत्सव मिरवणूक यंदा वेळेत पार पाडण्यासाठी पाेलिसांनी वेगवेगळ्या गणेश मंडळाशी चर्चा करुन नियाेजन केले होते. डीजेचा वापर मर्यादित ठेवण्यासाेबत लेझरवर बंदी घालण्याचा तसेच या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घेतला होता. पण पोलिसांच्या आदेशांना हरताळ फासत गणेश मंडळांनी डीजेच्या मोठमोठ्या थप्प्या लावत ध्वनी प्रदूषण केले. गणेश मंडळांना पुढे ढकलण्यासाठी पाेलिस पथकांची मिरवणूक मार्गावर तसेच अलका चाैकात कमतरता असल्याचेही या प्रकरणी दिसून आले.
श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मिरवणूक १७/०९/२०२४ रोजी दुपारी १५.५१ सुरू बेलबाग चौकात आली दुपारी १६.३५ वा.विसर्जन झाले १७/०९/२०२४रोजी रात्रौ २०.५६ वा.
हुतात्मा बाबु गेनू मंडळ१८/०९/२०२४ रोजी पहाटे ०१.१४ वा. मिरवणूक सुरू ,१८/०९/२०२४रोज १ पहाटे ०३.०६ वा.लक्ष्मीरोड ला आली, १८/०९/२०२४ रोजी सकाळी ०६.१५ वा. विसर्जन झाले.
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट १८/०९/२०२४ रोजी पहाटे ०३.१० वा. मिरवणूक सुरू, १८/०९/२०२४ रोजी पहाटे ०४.२३ वा लक्ष्मीरोड ला आली. १८/०९/२०२४रोजी सकाळी ०८.०६ वा. विसर्जन झाले.
अखील मंडई गणपती मंडळ मिरवणूक १८/०९/२०२४ रोजी पहाटे ०४.२५ वा.सुरू, १८/०९/२०२४ रोजी पहाटे ०५.२५ वा.लक्ष्मीरोड ला आली १८/०९/२०२४रोजी सकाळी ०९.१० वा. विसर्जन झाले
डीजेचा आवाज कमी किंवा बंद करण्याच्या मुद्यावरून काही ठिकाणी गणेश मंडळाचे कार्यकर्ते व पाेलिस यांच्यात वादावादीचेही प्रसंग घडले. मानाचे गणपतीच्या मिरवणुकीने अधिक काळ घेतल्याने उर्वरित मंडळांना त्यांचे पारंपारिक वाद्य तसेच डीजे वाजवण्यास पुरेसा वेळ न मिळाल्याने मंडळानी नाराजी व्यक्त केली. टिळक रस्ता व कुमठेकर रस्त्यावरील डीजे पथक असलेल्या मंडळांनी रात्री 12 वाजल्यापासून सकाळी 6 वाजेपर्यंत ठिय्या आंदोलन केले. यामुळे ही मिरवणूक रेंगाळली गेली. अनेक मंडळांनी उच्च क्षमतेच्या साऊंडचा वापर केल्याने सदर मंडळांविराेधात कारवाई करण्याचा इशारा पाेलिसांकडून देण्यात आला आहे. पाेलिसांकडून ध्वनीवर्धकाची आवाज मर्यादा तपासणीसाठी 126 पथके नेमण्यात आली हाेती.मात्र त्याचा फारसा प्रभाव दिसून आला नाही .गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ध्वनिपातळीत घट होऊनही ध्वनिप्रदूषणाच्या सर्व मर्यादा ओलांडून यंदाच्या मिरवणुकीतही सरासरी ९४.८ डेसिबल ध्वनि पातळीची नोंद झाली. त्यातही बेलबाग चौक आणि होळकर चौकात सर्वाधिक ११८ डेसिबल ध्वनिपातळी नोंदवली गेली.
दहा प्रमुख चौकातील सरासरी ध्वनिपातळी
बेलबाग चौक – ९९.८
गणपती चौक – ९५.८
लिम्बराज चौक – ९८.१
कुंटे चौक – ९४.९
उंबऱ्या गणपती चौक – ९२.२
गोखले चौक – ९३.५
शेडगे विठोबा चौक – ९२.८
होळकर चौक – ९४
टिळक चौक – ९६.७
खंडूजी बाबा चौक – ९०.२
मागील काही वर्षांत मिरवणुकीसाठी लागलेला वेळ कायम राखण्यात मात्र यश
2016 : 28 तास 30 मिनिट
2017 : 28 तास 05 मिनिट
2018 : 27 तास 15 मिनिट
2019 : 24 तास
2020 आणि 2021 : कोविड महामारीमुळे मिरवणूक निघाली नाही
2022 : 31 तास
2023 : 28 तास 40 मि.
पुणे शहरातील ०४ मुख्य मिरवणुक मार्गापैकी लक्ष्मी रोड १३१ टिळक रोड १७०, कुमठेकर रोड ५४, केळकर रोड ९७ असे एकुण ४५२ मंडळांनी अलका टॉकीज चौका मध्ये येवुन त्यांचे विसर्जन झालेले आहे. तसेच खडकी, लष्कर, येरवडा, कर्वेरोड, दत्तवाडी व शहराच्या इतर भागात शांततेत विसर्जन मिरवणुका पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये ३७६३ सार्वजनिक व १०१४६३७ घरगुती गणेश मंडळांनी विसर्जन केले आहे. गणेश विसर्जन मिरवणुका दिनांक १७/०९/२०२४ रोजी १०.१५ वा. सुरु झाल्या व दिनांक १८/०९/२०२४ रोजी सायं १५.०० वा. अलका चौक याठिकाणी विसर्जन मिरवणुक समाप्त झाली. (२८ तास ४५ मिनिटे)