पुणे – लोकसभेची पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दिल्याने आयोग आणि निवडणूक टाळणाऱ्या भाजपला सणसणीत चपराक बसली आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष, माजी आमदार मोहन जोशी यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पुणे शहर लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांचे २९ मार्च २०२३ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली होती. लगेचच पोटनिवडणूक घेणे अपेक्षित होते. परंतु, कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षाने भाजपचा दारुण पराभव केला, त्याची धास्ती घेऊन सत्ताधारी भाजपने अनेक क्लृप्त्या लढवत लोकसभेची पोटनिवडणूक टाळली. अखेर न्यायालयानेच चपराक दिली आहे, भाजपने गेली १० वर्षे निवडणूक आयोग आणि अन्य स्वायत्त संस्थांचा हुकूमशाही पद्धतीने मनमानी वापर केला. पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक टाळणे हे त्याचेच द्योतक आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
कसबा मतदारसंघातील आमदार मुक्ता टिळक यांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले. त्यानंतर १० दिवसांतच विधानसभेची पोटनिवडणूक घोषित करण्यात आली. मात्र, बापट यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक टाळण्यात आली, हा घटनाक्रम पाहता, भाजपने पराभवाच्या भितीने निवडणूक टाळली असे म्हणता येईल. पुणे हे महत्वाचे शहर आहे. लोकप्रतिनिधींविना हे शहर ठेवून येथील मतदारांवरही अन्याय झालेला आहे, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.
महापालिकेच्या निवडणुकाही लांबवण्यामागे भाजपच्या नेत्यांचाच हात आहे. निवडणुकांनंतर महापालिकाही आपल्या हातून निसटेल, अशी धास्ती भाजपला वाटते, असा आरोप मोहन जोशी यांनी पत्रकात केला आहे.

