– केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती
– सोमवारपासून पुणे-कोल्हापूर-हुबळी फेऱ्यांना सुरुवात
पुणे (प्रतिनिधी) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्याला मिळालेल्या पहिल्या वंदे-भारत एक्स्प्रेसचे लोकार्पण सोमवारी (उद्या) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने होणार असून पुणे-हुबळी या वंदे-भारत एक्स्प्रेसला केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ हे पुणे स्थानकावरुन झेंडा दाखवणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून पुणेकरांना प्रतिक्षित असणारी तसेच पुण्याहून सुटणाऱ्या पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसमुळे सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूरमधील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने मोदी सरकारकडून महाराष्ट्राला ३ नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या असून यात पुणे-हुबळी, नागपूर-सिकंदराबाद आणि कोल्हापूर-पुणे आदी मार्गाचा समावेश आहे. या तिन्ही वंदे भारतचे लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
पहिल्या वंदे भारत एक्स्प्रेसबद्दल माहिती देताना मोहोळ म्हणाले, ‘पुण्याला पहिली वंदे भारत एक्स्प्रेस मिळाली, ही पुणेकर प्रवाशांसाठी निश्चितच आनंदाची बाब आहे. केवळ पुणेच नाही तर या एक्स्प्रेसचा फायदा पश्चिम महाराष्ट्राच्या संपूर्ण पटट्यासाठी होणार आहे. पुणे, सातारा, मिरज, सांगली आणि कोल्हापूर या भागात दळणवळण भक्कम होण्यास हातभार लागणार आहे. शिवाय यामुळे अर्थकारणालाही गती मिळणार आहे.’
मोदी सरकार महाराष्ट्राच्या विकासासाठी कटिबद्ध असून महाराष्ट्रात आताच्या घडीला रेल्वे मंत्रालयाच्या मार्फत ८१ हजार ५८० कोटी रुपयांची विकासकामे सुरु आहेत. शिवाय यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पातून रेल्वेसाठी महाराष्ट्राला १५ हजार ९४० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यात १३२ रेल्वे स्थानक जागतिक दर्जांची करण्यात येत असून एकूण ८ वंदे भारत एक्सप्रेस महाराष्ट्रात धावत आहेत, असेही केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले.