पुणे, दि. १२ : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने खेड-आळंदी विधानसभा मतदार संघात इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (ईव्हीएम) आणि व्हीव्हीपॅटबाबत जनजागृती आणि प्रात्यक्षिक करण्यात येणार असून त्यासाठी तयार करण्यात आलेल्या जनजागृती फिरत्या रथाचा शुभारंभ खेड तहसील कार्यालयाच्या आवारात उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
राजगुरूनगर येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार दिलीप मोहिते पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अपर जिल्हाधिकारी अजय मोरे, उप विभागीय अधिकारी अनिल दौंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिलिंद बारभाई, तहसीलदार ज्योती देवरे, गट विकास अधिकारी विशाल शिंदे, नगर परिषदेचे मुख्यधिकारी अजिंक्य रणदिवे आदी उपस्थित होते.
मतदार संघातील कर्मचाऱ्यांना ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्याक्षिकाचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत. ते सर्व मतदान केंद्रांतर्गत गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठ, मॉल आदी ठिकाणी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राबाबत प्रात्यक्षिके करुन दाखविण्यात येणार आहेत.
अधिकाधिक नागरिकांनी यामध्ये सहभागी होऊन
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची प्रत्यक्ष हाताळणी करावी. यावेळी नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येईल. नागरिकांनी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राच्या प्रात्यक्षिकांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही तहसील कार्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.
00000