पुणे– विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवा वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रूपाली ठोंबरे पाटील यांनी या प्रकरणी स्पष्ट मत मांडत पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांना विधान परिषदेवर पाठवण्यास तीव्र विरोध केला आहे. तुम्ही एकाच महिलेला किती पदे देणार? असा कळीचा प्रश्न त्यांनी यासंबंधी उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस राज्यपाल नियुक्त आमदारांच्या कोट्यातून आपल्या 3 नेत्यांना विधान परिषदेवर पाठवणार आहे. त्यात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे व सिद्धार्थ कांबळे यांना संधी दिली जाण्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रूपाली ठोंबरे पाटील यांनी चाकणकर यांच्या नावावर आक्षेप नोंदवला आहे. या प्रकरणी त्यांनी थेट अजित पवार यांच्याकडे न्यायाची याचना केली आहे. यामुळे राष्ट्रवादीपुढे बाका प्रसंग उभा राहिला आहे.
रूपाली ठोंबरे पाटील गुरुवारी एक फेसबुक पोस्ट आणि ट्विट करून आपले म्हणणे मांडले. त्या म्हणाल्या की, एक व्यक्ती एक पद या न्यायानुसार आमचे अजितदादा न्याय नक्की देतील असा विश्वास आहे. एकाच महिलेला किती पदे देणार? कालपासून बातमी वाचत आहे. बातमीची शहानिशा केली तर पक्षाने कोणतेही पत्र अधिकृत दिले नाही असे सांगितले. पक्षाला कळकळीची विनंती असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये इतरही महिला आहेत. त्या सक्षमतेने, दमदार कामाने मोठ्या आहेत. पक्षात कर्तृत्ववान महिला खूप आहेत. त्यामुळे सक्षम, काम करणाऱ्या महिलांचा विचार करावा. इतर महिलांना समान संधी द्यावी, ही विनंती असेल.
उल्लेखनीय बाब म्हणजे रुपाली ठोंबरे यांनी रूपाली चाकणकर यांच्याविरोधात नाराजी व्यक्त करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी गत जून महिन्यातच या प्रकरणी अजित पवार यांची भेट घेतली होती. महिला आयोगाचे अध्यक्षपद असो किंवा महिला प्रदेशाध्यक्षपद असो, ठराविक काळाने सर्व महिलांना समान संधी मिळाली पाहिजे, अशी भावना त्यांनी त्यावेळी बोलून दाखवली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी चाकणकरांना विधान परिषदेवर पाठवण्यास कडाडून विरोध दर्शवला आहे.
“सध्या राज्यपाल नियुक्त आमदार निवडीसंदर्भातील चर्चा सुरु आहेत. मात्र, त्यासाठीचे नियम असे आहेत की, वकील, डॉक्टर यांच्यासह सामाजिक कार्यातील तज्ञ लोकांचा समावेश असावा. पण कालपासून काही बातम्या येत आहेत. त्या आमच्यासाठी धक्का देणाऱ्या आहेत. त्यामध्ये लोकशाही पद्धतीने कोणाचेही नावे आलेले नाहीत. आम्ही पक्षाकडे विचारलं तर पक्षाने सांगितलं की ही बातमी पक्षाची नाही. मग अशा पद्धतीच्या बातम्या येतात कुठून? विधानपरिषदेवर जाण्यासाठी कोणीही उत्सुक असू शकतं. मग मी देखील उत्सुक असू शकते. किंवा आमचे इतर कोणी पदाधिकारी असतील. माझं एवढंच म्हणणं आहे की, त्यांच्याकडे आधीच राज्य महिला आयोगाचं पद आहे. तसंच महिला प्रदेशाध्यक्ष पदही आहे. मग अशा पद्धतीच्या बातम्या येतात कुठून? या बातम्या कोण पेरतं? पक्षात अजूनही दुसऱ्या अनेक महिला आहेत त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. महायुतीमध्ये दुसऱ्या पक्षातील नावांची कुठेही चर्चा होत नाही. मग राष्ट्रवादीमधील नावं अशी चर्चेत कशी येतात?”, असे अनेक सवाल रुपाली पाटील-ठोंबरे यांनी उपस्थित केले आहेत.
रुपाली पाटील-ठोंबरे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर प्रतिक्रिया देताना रुपाली चाकणकर म्हणाल्या, “त्यांच्या प्रश्नांवर आमच्या पक्षाच्या प्रवक्त्या उत्तर देतील. मला वाटत नाही की त्यांचे प्रश्न हे उत्तर देण्यासारखे आहेत. आता मला हे सर्व प्रश्न तुमच्याकडून समजत आहेत. त्यामुळे याबाबत मला काहीही माहिती नाही. आमच्या महिला पदाधिकाऱ्यांची बैठक सुरु आहे. त्यामुळे मी काहीही पाहिलेलं नाही. मी त्यांचे प्रश्न पाहते आणि माहिती घेते, त्यानंतर माहिती देते”, अशी प्रतिक्रिया रुपाली चाकणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

