अमृत महोत्सवी वर्षानिमित्त साकारणार ‘भव्य सुदर्शन दरबार’
पुणे : फर्ग्युसन रस्त्यावरील सुदर्शन मित्र मंडळ यंदा ७५ व्या वर्षात पदार्पण करीत असून अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. त्यानिमित्त भव्य दिव्य असा सुदर्शन दरबार हा काल्पनिक महालाचा देखावा यंदा गणेशोत्सवात उभारण्यात येणार आहे. अंदाजे ८० फूट बाय ४० फूट इतका भव्य असणारा हा देखावा सप्तरंगी दिव्यांनी सजविण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष श्याम मारणे यांनी दिली.
सुदर्शन मित्र मंडळाची स्थापना सन १९५० साली झाली. त्यावर्षीचे पहिले अध्यक्ष शंकरराव भारती होते आणि आत्ताचे अध्यक्ष शाम मारणे आहेत. मागील ३० वर्षांपासून अध्यक्ष म्हणून मंडळाचा कार्यभार ते यशस्वीपणे पहात आहेत.
धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्यात देखील तितक्याच उत्साहात सहभागी होणे हे पुण्यातील गणेशोत्सव मंडळाचे वैशिष्ट्य आहे. सुदर्शन मित्र मंडळ देखील आपली सामाजिक बांधिलकी अनेक वर्षांपासून जपत आहे. रक्तदान शिबीरे, वृक्षारोपण, विविध सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करणे, आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये वारकऱ्यांना आवश्यक उपयुक्त वस्तूंचे वाटप ही कामे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून वर्षभर सुरू असतात. यासोबतच विविध संसथा च्या विधायक उपक्रमांमधे सहभागी होणे, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण देखील मंडळाच्या माध्यमातून साजरे केले जातात.