बदलापूर प्रकणातील आपटे व महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार आपटे अजून मोकाट कसे? पाकिस्तानात पळून गेले का?
अजित दादांनी निवडणुका जाहीर कराव्यात म्हणजे समोर येऊन जनता काय करेल ते दिसेल?
सोयाबीनशी संबंधित उत्पादनांची आयात थांबवा, सोयाबीनला ७ हजार रुपये तर धानाला ३ हजारांचा भाव द्या.
मुंबईला, दि. ३ सप्टेंबर २०२४
महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस फेल झाले आहेत तर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला बदलापूर घटनेतील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. बदलापूर घटनेतील आरोपी आपटे व शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अजून अटक का झाली नाही? ते पाकिस्तानात पळून गेले काय? पुण्यातही एका माजी नगरसेवकाची गोळ्या घालून व कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली. हे सर्व लक्षात घेता मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्याचा राजीनामा घ्यावा व पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना निलंबित करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपा युती सरकारवर तोफ डागली, ते पुढे म्हणाले की, बदलापूरमध्ये चिमुरड्यांवर १५ दिवस अत्याचार सुरु होते हे उघड झाले आहे, शाळेतील १५ दिवसांचे सीसीटीव्ही फुटेजही गायब आहे. बदलापूर पोलीस स्टेशनमधील महिला अधिकाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांची मुंबईत बदली करुन एकप्रकारे बक्षिसच दिले आहे. ही शाळा भाजपा आरएसएसशी संबंधित असल्याने शाळा संचालक आपटेला वाचवण्याचा प्रयत्न केला जात असून पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे त्यात योगदान दिसत आहे.
राज्यातील शेतकरी अस्मानी सुलतानी संकटात सापडला आहे. मराठवाडा, विदर्भात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे, शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. अजून पंचनामे झाले नाहीत, मदत पोहचणे तर दुरची गोष्ट आहे. मागील पावसाळ्यात झालेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अजून मिळालेली नाही. पण भाजपा युती सरकार मात्र जनतेच्या पैशावर इव्हेंटबाजी करून स्वतःची पाठ थोपटवून घेत आहेत. सणासुदीच्या दिवसात शेतकरी व जनतेला वाऱ्यावर सोडून सरकारी तिजोरी लुटली जात आहे. शेतकरी संकटात असताना केंद्र सरकारही शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहे. सोयाबीनला फक्त ३००० हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे आणि १३ लाख मेट्रीक टन सोयाबीनशी संबंधित उत्पादनांची आयात केली आहे. केंद्रातील भाजपा सरकार मोठ्या प्रमाणात आयात करून खास मित्राला फायदा करून देत आहे आणि शेतकऱ्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे, ही आयात थाबंवली पाहिजे. सरकारने सोयाबीनला ७ हजार रुपये भाव जाहीर करावा तसेच धानाला ३ हजाराचा भाव जाहीर करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली असून त्या संदर्भात आपण पंतप्रधानांना आपण पत्र लिहिले आहे असे पटोले म्हणाले.
पोस्टरला काय जोडे मारता हिम्मत असेल तर समोर या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वक्तव्यावर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, अजित पवारांमध्ये हिम्मत असेल तर त्यांनी निवडणूक लावावी म्हणजे जनता समोर येऊन काय करेल ते त्यांना दिसेल.
भाजपा आमदार नितेश राणेंवर बद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता नाना पटोले म्हणाले की, नितेश राणे पोलिसांनाच शिव्या देतो, धमक्या देतो पण त्याच्यावर कारवाई केली जात नाही. कोणाच्याही धर्माला शिव्या देण्याचा अधिकार कोणालाच नाही पण निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात शांतता रहावी ही आमची भूमिका आहे. सामाजिक वातावरण बिघडण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
जातनिहाय जनगणनेचे राजकारण करु नये या आरएसएसच्या विधानावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, यात राजकारण नाही. शोषित, वंचित, पीडित समाजाला शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक फायदा मिळावा व समाजाच्या मुख्य प्रवाहात या घटकांना आणण्यासाठी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे आहे. या समाज घटकांचे भले व्हावे हीच त्यामागची भूमिका आहे. भाजपा सरकार मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देत नाही, उच्च शिक्षणाचे दरवाजे बंद करत आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अनेकदा आरक्षण संपवले पाहिजे अशी जाहीर भूमिका मांडलेली आहे, असे पटोले म्हणाले.