नागपूर- दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांची एसआयटी चौकशी होणार आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करायची असेल, हा तपास सीआयएकडे द्यायचा असेल किंवा केजीबीकडे द्याचा असेल तर द्या, असे आव्हान ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना राज्य सरकारला दिले.
आपल्या राजकीय विरोधकांच्या संदर्भात खोटे भ्रम निर्माण करायचे, बदनामी करायची आणि आपली राजकीय पोळी भाजायची हा सरकारचा डाव आहे. हा बदनामी करण्याचा कारखाना आहे. पण आम्ही त्यांना भीक घालत नाही. त्यांना एसआयटी लावायची असल्यास खुशाल लावावी. लाखो लोक शिवसेनेत आहेत. प्रत्येकामागे एसआयटी लावा. राज्यात कायदा सुव्यवस्थेबद्दल काही बोललेले सरकारला आवडत नाही. 2024 नंतर सरकार बदलणार आहे. कोणी सत्तेचा अमरपट्टा बांधून आलेला नाही, असे राऊत यांनी सांगितले.
पंतप्रधानांवर टीका काही राष्ट्रीय स्वरूपाची नसते. दोन दिवसांपूर्वी पंडित नेहरूंवर अमित शहा यांनी टीका केली. या देशात लोकशाही, संविधान आहे. राजकीय भूमिका घेऊन कोणी टीका करीत असेल आणि त्यावर एखाद्या पक्षाचे लोक गुन्हे दाखल करून अटकाव करण्याचा प्रयत्न करीत असेल तर या लोकांना आम्ही आणीबाणीविरुद्ध लढा दिला असा डंका पिटण्याचा अधिकार नाही, अशी टीका राऊत यांनी केली.
मुंबई महापालिकेचे ऑडिट होणार आहे. नक्कीच करा. गेल्या दीड वर्षापासून फक्त मुंबई महानगरपालिका नाही तर पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, ठाणे या सर्व महानगरपालिकांचे ऑडिट व्हायला पाहिजे. आणि नगर विकास खात्याचा गेल्या दीड वर्षाच्या कारभाराचे आणि व्यवहाराचे ऑडिट करा. कारण महापालिका नगर विकास खात्याच्या अंतर्गत येतात. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला. त्यांच्यावर दबाव येत होता. आधी सदस्यांनी राजीनामे दिले आता अध्यक्षांनीही दिला. विशिष्ट अहवाल देण्यासाठी त्यांच्यावर दबाव येत होता. मला शिव्या दिल्याने काही फरक पडत नाही, असेही ते यावेळी म्हणाले.

