नागपूर-हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्षा आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबईत वाढत असलेल्या प्रदूषणामुळे लहान आणि वयोवृद्धांमध्ये मोठ्या प्रमाणात श्वसनाचे आजार वाढत आहेत. तसेच प्रदुषणाच्या बाबतीत आज मुंबई दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, सरकार प्रदूषण नियंत्रणाच्या नावाखाली फक्त इव्हेंटबाजी करत आहे, असे त्या म्हणाल्या.
आयआयटीबी व राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संस्थेच्या अहवालानुसार, 71 टक्के प्रदूषण हे मोठ्या प्रमाणात सुरू असलेले प्रकल्प आणि विकासकामे यांच्यामुळे होत आहे. याबद्दल सरकारने योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. राज्याची धोरणे तयार करणारे प्रदूषणाच्या बाबतीत योग्य निर्णय घेत नसतील तर सर्वसामान्य जनतेची काय परिस्थिती होईल. तसेच दिल्लीत प्रदूषणामुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे. ती मुंबईवर येणार का? याबाबत ताबडतोब निर्णय घेणे आवश्यक आहे, असा मुद्दा सभागृहात प्रा. वर्षा गायकवाड यांनी सभागृहात मांडला.
सरकार इवेन्टबाजी करण्यात पटाईत आहे. मुख्यमंत्र्यांनी धारावीला भेट दिली तेव्हा त्यांनी डीप क्लीनच्या माध्यमातून पाण्याची फवारणी करून रस्ता साफ केला. पण हा रस्ता मुख्यमंत्री येणार म्हणून मध्यरात्री 2.30 वाजता साफ करण्यात आला होता. सरकार फक्त आपल्या कार्यक्रमांच्या दिवशी साफसफाईचा देखावा करते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तिकडे कचरा साचतो. तो साफ करायची जबाबदारी कोणाची? असा सवाल गायकवाड यांनी यावेळी उपस्थित केला.
प्रा. वर्षा गायकवाड यांच्या या विधानावर भाजप नेते राम कदम यांनी रस्ते स्वच्छ होत असल्यामुळे प्रदूषण कमी होत असल्याचा दावा केला. त्यावर रस्ता फक्त इवेन्टबाजी करायला स्वच्छ करायचा नसतो तर अभियान राबवताना रस्ता रोज स्वच्छ झाला पाहिजे, तर त्या मोहिमेला काहीतरी अर्थ आहे, अशी टीका प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.
वर्षा गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून रस्ते तयार करून देण्याची मागणी केली होती. त्यावेळी, आम्ही येत्या सहा महिन्यात मुंबईत चारशे किलोमीटरपर्यंत रस्त्यांचे काँक्रीटीकरण करू, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. पण आज दोन वर्ष झाली तरी रस्त्यांची कामे झाली नाही. 680 कोटींचे टेंडर पास होऊनही रस्त्यांची अवस्था अजुनही जैसे-थेच आहे. हे टेंडर रद्द झाल्यावर आता ते पुन्हा रिटेंडर कधी होणार? असा प्रश्न विचारून, मुंबईला वेठीस धरण्याचं काम केलं, मुंबईचे रस्ते अडवण्याचं काम केलं त्यांना येणाऱ्या काळामध्ये शिक्षा झालीच पाहिजे. एक मुंबईकर म्हणून मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा आमदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी सभागृहात मागणी केली.

