ज्यांनी आयुष्यभर इंग्रजांची चाकरी केली, त्यांना तर याची कल्पना येणार नाही
मुंबई-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सूरत लुटीविषयी केलेल्या विधानाचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी चांगलाच समाचार घेतला. काँग्रेस पक्षाने स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग भोगला. पण यांच्या लोकांनी माफीनामे लिहिले. त्यामुळे या माफीवीरांना स्वराज्यासाठी शिवछत्रपती व काँग्रेसने काय केले हे केव्हाच कळणार नाही, असे ते म्हणालेत.
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण तापले आहे. या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारवर टीकेची झोड उठली असताना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासंबंधी माफी मागून या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसने शिवरायांनी सूरत लुटल्याचा खोटा इतिहास शिकवल्याचा दावा केला आणि विरोधकांनी पुन्हा सरकारवर टीका करण्याची संधी मिळाली. या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.
पृथ्वीराज चव्हाण येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, देवेंद्र फडणवीस सुशिक्षित आहेत. पंडित नेहरू यांचे डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे इंग्रजीतील मूळ पुस्तक आहे. या पुस्तकात शिवछत्रपतींनी स्वराज्य निर्मितीसाठी परकीयांवर आक्रमण केले, त्यांचे किल्ले, खजिना लुटला हे स्पष्टपणे लिहिले आहे. शिवरायांनी हे सर्वकाही स्वराज्य निर्मितीसाठी केले. आम्हाला त्यांचा अभिमान आहे. पण ज्यांनी आयुष्यभर इंग्रजांची चाकरी केली, त्यांना याची कल्पना येणार नाही.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. बदलापूर, मालवण व पुण्यासारख्या घटनेमुळे हे स्पष्ट होते. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत असताना भाजपला केवळ सत्ता राखण्यातच रस आहे. देशातील एकूण आत्महत्यांपैकी 37 टक्के आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात होत आहेत. सर्वच आघाड्यांवर हे सरकार अपयशी ठरले आहे. त्यामुळे आता विधानसभेची निवडणूक पुढे ढकलण्याचा त्यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार?
पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यताही व्यक्त केली. भाजपने लोकसभा निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. पण त्यांचा दारुण पराभव झाला. भाजप या धक्क्यातून अजून सावरला नाही. आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लांबवली तर कदाचित परिस्थिती सुधारेल असे त्यांना वाटत आहे. काहीही झाले तरी त्यांना 26 नोव्हेंबरच्या आत निवडणूक घ्यावी लागेल. अन्यथा त्यांना राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी लागेल.
पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी भाजपची सुपारी घेतल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, लक्ष्मण हाके राजकारणात नवीन आहेत. माझी व त्यांची ओळख नाही. मी कुणाची सदिच्छा भेट घेतली तर तो माझा हक्क आहे. माझी मराठा आरक्षणावरील भूमिका जाहीर आहे. कारण मुख्यमंत्री असताना सर्वप्रथम मी मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले होते. हे आरक्षण आम्ही ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता दिले होते.
लक्ष्मण हाके यांनी माझे विधानसभेतील आरक्षणावरील भाषण वाचावे. त्याची प्रत मी त्यांना पोहोचवेन. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीत काय म्हणाले हे ही सर्वश्रूत आहे. त्यांनी ओबीसींच्या हितासाठी जातगणनेचा आग्रह धरला आहे. हाके यांना हे समजत नसेल तर ते भाजपची सुपारी घेऊन काम करत असावेत. त्यांना भाजपची सुपारी घ्यायची असेल तर त्यांनी भाजप प्रवेश करून निवडणुकीला सामोरे जावे.