नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचा संकल्प
बाणेर मध्ये आयोजित जागर स्त्री सामर्थ्याचा कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे:
महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहे. या अंतर्गत गेल्या पाच वर्षांत अनेक महिला बचत गटांना अर्थसहाय्य मिळवून दिले. आगामी काळात कोथरूड विधानसभा मतदारसंघातील १० हजार महिलांना उद्योजिका बनवण्याचा संकल्प असून त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची भावना नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज व्यक्त केली.
कोथरुड विधानसभा मतदारसंघातील बाणेर-बालेवाडी-पाषाण मधील महिला बचत गटांसाठी बाणेर मधील माऊली गार्डन येथे जागर स्त्री सामर्थ्याचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या आयोजिका सुजाता धनकुडे, हर्षदा थिटे, सुमन रेडवाल, भाजप उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, माजी नगरसेविका ज्योती कळमकर, स्वप्नाली सायकर, लहु बालवडकर, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, उमाताई गाडगीळ, विद्याताई बालवडकर, प्रकाशतात्या बालवडकर, विवेक मेथा, सचिन दळवी, प्रमोद कांबळे, संदीप तापकीर, महिला मोर्चाच्या अध्यक्षा अस्मिता करंदीकर, अंकिता दळवी, वैदेही बापट यांच्यासह भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
नामदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले की, महिला आर्थिक दृष्ट्या सक्षम झाल्या पाहिजेत, हा माझा नेहमीच आग्रह असतो. महिला आर्थिक सक्षमीकरणासाठी गेल्या पाच वर्षात बचत गटांना विना व्याज अर्थसहाय्य मिळवून देत; उद्योगांसाठी प्रोत्साहन दिले. आगामी काळात कोथरूड विधानसभा मतदारसंघातील दहा हजार महिलांना उद्योजिका बनवण्याचा संकल्प असून; त्या अनुषंगाने प्रयत्न सुरू आहेत.
ते पुढे म्हणाले की, महिला सक्षमीकरणासाठी बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध होणे आवश्यक असते. त्यासाठी मतदारसंघातील महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तूंसाठी दर महिन्याला प्रदर्शनाचे आयोजन करण्यास सुरु केले आहे. श्रावण महिन्यात त्याची सुरुवात झाली असून; कोथरूड उत्तर आणि दक्षिण दोन्ही भागांत हा उपक्रम राबविला जाणार आहे. त्यासोबतच कोथरुड मध्ये सुरु केलेल्या समुत्कर्ष ग्राहक पेठेच्या माध्यमातून ही महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, यावेळी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते. यामध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत, कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. या कार्यक्रमात लकी ड्रॉ देखील काढण्यात आला. यामध्ये विजेत्या महिलांना विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात आले.