राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यस्तरीय महिला व युवा पदाधिकारी अधिवेशन संपन्न …
मुंबई – ही निवडणूक आपण अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे. कुठेही हलगर्जीपणा दाखवता कामा नये. लोकसभेला त्याची किंमत आपण मोजलेली आहे. आपण विधानसभेला खूप चांगल्या योजना दिलेल्या आहेत. लोकसभेला जी फेक नकारात्मकता पसरविण्यात आली. खरं नसतानाही लोकांना जे खरं वाटलं आणि त्याची किंमत मोजावी लागली आहे त्यामुळे महिला व युवकांनी या निवडणुकीत सतर्क राहिले पाहिजे अशा सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिला व युवांच्या राज्यस्तरीय पदाधिकारी अधिवेशनात केली.
आपण धर्मनिरपेक्ष विचार सोडलेला नाही.राष्ट्रवादी काँग्रेस शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे चालला आहे हेही आवर्जून अजितदादा पवार यांनी स्पष्ट केले.
महायुतीत आपल्या जागा मिळतील त्या जास्तीत जास्त कशा निवडून येतील. कारण त्यावर तुमचंही आणि पक्षाचेही व आमचेही भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे येत्या तीन महिन्यात घरातील कामे बाजूला ठेवून पक्षाला आणि पक्षाच्या कामाला अग्रक्रम द्यावा लागेल, जास्त वेळ मेहनत करावी लागेल.
यावेळी अजितदादा पवार यांनी पाच वेगवेगळे कार्यक्रम दिले आणि त्याची अंमलबजावणी करणे अतिशय आवश्यक आहे असे सांगतानाच समर्पित भावनेने राष्ट्रवादी काँग्रेसचे काम तुम्हाला करायचे आहे अशा सूचना दिल्या.
पहिला कार्यक्रम म्हणजे ‘अजिंक्य घड्याळ’ हा युवा संवाद प्रत्येक मतदारसंघात म्हणजे आपल्याला जे मतदारसंघ असतील त्या किमान तीन तालुक्यात कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त युवा बैठका झाल्या पाहिजेत. यामध्ये योजना आणि पक्षाचा संदेश पोचला पाहिजे. मतदानाच्या तारखा जाहीर होण्याअगोदर या बैठका झाल्या पाहिजेत. या बैठकीत पक्षाचा इतिहास, केलेल्या पायाभूत सुविधांची माहिती द्या. काही झाले तरी नकारात्मक प्रचार होता कामा नये. पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे काम करावे लागणार आहे असेही अजित पवार यांनी सांगितले.
जनसन्मान यात्रेला महाराष्ट्रात चांगला प्रतिसाद मिळतोय. महिलांचै मोठे पाठबळ मिळत आहे. लाडकी बहीण योजना ही जास्त प्रभावी ठरली आहे असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
आगामी काळात महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ज्याठिकाणी जागा असतील तिथे जास्त लक्ष महिला व युवकांनी दिले पाहिजे. राज्यात वारंवार घडत असलेल्या घटना लक्षात घेता आपण डोळ्यात तेल घालून लक्ष दिले पाहिजे कारण आपण पक्षाचे सैनिक आहोत. आपले कुठलेही वागणे, बोलणे आणि कृती झाली तर त्याची जबरदस्त किंमत आपल्या पक्षाला मोजावी लागेल. उत्साहाच्या भरात प्रतिक्रिया द्यायला जातो आणि ते आपल्यावरच बुमरँग होते. त्यामुळे काही प्रतिक्रिया देताना तटकरेसाहेबांशी किंवा माझ्याशी संपर्क साधा असे आवाहनही अजित पवार यांनी यावेळी केले.
‘दादा तुम्ही कमाल केली’ राज्याच्या निर्मितीपासून आतापर्यंतच्या इतिहासात असा पहिला अर्थसंकल्प आपण मांडलात, की ५० टक्के लोकसंख्या असलेल्या आपल्या महिला भगिनींना भावाच्या नात्याने तुम्ही जो न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, तो राज्याच्या नाही, तर देशाच्या इतिहासात अजरामर ठरणार आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अजितदादांच्या निर्णयाचे कौतुक केले.
आमच्यासाठी पाठीराखा असणारा हा भाऊराया आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान होताना पाहायचा आहे. त्यासाठी महिलाशक्तीची ताकद अजितदादांच्या पाठीशी आहे त्यामुळे आमच्या भगिनींचे स्वप्न सत्यात नक्कीच उतरेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी व्यक्त केला.
जनसन्मान यात्रेला मिळत असलेला अभूतपूर्व प्रतिसाद बघता पुढच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस हा एक नंबरचा पक्ष असेल असा विश्वास युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी व्यक्त केला.
शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘राज्यस्तरीय महिला व युवा पदाधिकारी अधिवेशन’ मुंबईतील महिला आर्थिक विकास मंडळाच्या सभागृहात पार पडले.
या अधिवेशनात प्रामुख्याने येत्या काळात महिला कार्यकर्त्यांनी व युवा कार्यकर्त्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने पार पाडाव्यात, यावर मार्गदर्शन करण्यात आले. अजितदादांनी अर्थसंकल्पात मांडलेल्या योजनांचा प्रचार व प्रसार घराघरात करण्यासाठी व पक्षाने राबवलेल्या अभियानाची सकारात्मकतेने अंमलबजावणी करावी, यासाठी काही सूचनाही करण्यात आल्या.
या अधिवेशनाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, पक्षाचे कोषाध्यक्ष आमदार शिवाजीराव गर्जे आदींसह महिला, युवा पदाधिकारी उपस्थित होते.