पुणे : सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्टतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सुगम संगीत गायन स्पर्धेला पुण्यातील दिडशेपेक्षा जास्त गायकांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट सादरीकणाद्वारे रसिकांना मोहित केले. दिव्यांग स्पर्धकांचे सादरीकरण लक्ष्यवेधी ठरले.
सहजीवन गणेश मित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षापासून स्पर्धांचे आयोजन करण्यात येत असून या स्पर्धा नियमितपणे भरविण्याचा निर्धार मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. सहकार नक्षर नं. 2मधील सहजीवन गणेश मंडळाच्या आवारात स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे परीक्षण गायक शेखर कुंभोजकर आणि स्वप्न करंदीकर यांनी केले. सर्व गटांमध्ये मिळून 30 विजेत्यांना बक्षिस देऊन गौरविण्यात आले. रोख रक्कम आणि ट्रॉफी असे बक्षीसांचे स्वरूप होते.
विवान देव्हारे, श्रेया महामुनी, ऋचा महामुनी, रुपाली पंडित, संजय दातार, माया दाभोळकर, श्लोक चावीर यांनी आपआपल्या गटात प्रथम क्रमांकाचे बक्षीसे पटकावले. समूह गीत स्पर्धेत निविदिता व्होकल अकॅडमी व स्वरानुभव ग्रुप यांना बक्षीस मिळाले. युगल गीत गायन स्पर्धेत आदिती आणि नेहा यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
स्पर्धेचे बक्षीस वितरण लायन शरदचंद्र पाटणकर, शुभांगी पाटणकर, गायिका मंजुश्री ओक, लायन दीपिका खिवसरा तसेच मंडळाचे अध्यक्ष नितीन पाटील, उत्सव समितीचे अध्यक्ष विनय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. मंडळाचे पदाधिकारी मदन कटारिया, रोहन भोसले, अद्वैत काळे, सचिन समेळ, अर्चना जोशी, सोहम जोशी, स्मिता पाटील, धनश्री दातार व गायक राजेश दातार उपस्थित होते. अन्वय बेंद्रे यांनी सूत्रसंचालन केले.
संजीवन गोसावी आणि राधिका दातार यांनी स्पर्धेचे संयोजन केले. सामाजिक, सांस्कृतिक असे अनेक उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात. त्यास रसिकांनी आणि स्पर्धकांनी मनापासून सहकार्य केले आणि दाद दिली.