पुणे- साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देणार नाही:राज्य शिवरायांच्या विचारांवर चालते,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी महाराष्ट्राची जाहीर माफी मागितली. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांची माफी धुडकावून लावली आहे. शिवाजी महाराजांनी भ्रष्टाचार व निष्काळजीपणाला केव्हाच माफी दिली नव्हती. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकत नाही, असे ते म्हणाले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी त्यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 रोजी एका दिमाखदार कार्यक्रमात या पुतळ्याचे अनावरण केले होते. हा पुतळा सोमवारी (26 ऑगस्ट) दुपारी अचानक कोसळला. तो नेमका कशामुळे कोसळला? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण यामुळे जनतेमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी महायुती सरकारवर टीकेची झोड उठली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी शिवप्रेमींची जाहीर माफी मागून जनक्षोभ शांत करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत. त्यामुळे मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांची माफी मागतो, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी माफी मागितल्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुन्हा त्यांच्यावर पलटवार केला. जयंत पाटील आपल्या एका ट्विटमध्ये म्हणाले की, भ्रष्टाचार आणि निष्काळजीपणाला महाराजांनी कधीच माफी दिली नव्हती. आमचा महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी दाखवलेल्या वाटेवर चालतो. त्यामुळे साहेब, महाराष्ट्र या चुकीला माफी देऊ शकणार नाही. प्रायश्चित अटळ आहे. जय शिवराय.
एकनाथ शिंदे , अजित पवार यांनी हि मागितली होती माफी …
जयंत पाटील यांच्या या ट्विटनंतर पंतप्रधानांच्या माफीनंतरही शिवरायांच्या पुतळा कोसळल्याच्या मुद्यावरून विरोधकांचा संताप शमणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारीच या प्रकरणी महाराष्ट्राची माफी मागितली होती. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. त्यामुळे मी एकदा नाही तर 100 वेळा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर माफी मागायला तयार आहे, असे ते म्हणाले होते.
तत्पूर्वी, अजित पवार यांनीही या प्रकरणी जाहीर माफी मागितली होती. राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा वेगवान वाऱ्यामुळे पडला. या राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून मी राज्यातील 13 कोटी जनतेची माफी मागतो. तसेच या दुर्घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याची ग्वाहीही देतो. सदर पुतळ्याचे काम चांगल्या दर्जाचे झाले पाहिजे होते. कारण, हे सर्व लोक राष्ट्रनिर्मिती करण्यात अग्रेसर होते. त्यांचे विचार कायमच आपणास प्रेरणा देत असतात. त्यामुळे अशी चूक भविष्यात पुन्हा होणार नाही असा शब्द मी देतो, असे ते म्हणाले होते.